NIA ATS Raids in Maharashtra : मालेगावातील 'तो' होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर, कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता, नेमकं काय घडलं?
NIA ATS Raids in Maharashtra : मालेगाव येथे एनआयए, एटीएस आणि आयबी या तीन सुरक्षा एजन्सीकडून संयुक्तपणे कारवाई करत एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगावात एनआयए, एटीएस व आयबी या तीन सुरक्षा एजन्सीकडून संयुक्तिक कारवाई करण्यात आली आहे. अब्दुल्लानगर मधील एका होमिओपॅथी डॉक्टरच्या क्लिनिकवर तसेच त्याच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे.
होमिओपथी डॉक्टर एटीएसच्या रडारवर
काल मध्यरात्रीपासून या डॉक्टरची कसून चौकशी केली जात आहे. सहा तासांच्या चौकशीनंतर डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्या डॉक्टरला मालेगाव नियंत्रण कक्ष येथे आणण्यात आले आहे. दरम्यान, या संशयिताकडून काही साहित्य जप्त करण्यात आले का? चौकशीत काय निष्पन्न झाले? याबाबत तीनही पथकाकडून प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे. या घटनेमुळे मालेगावात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालन्यातून तिघांना घेतलं ताब्यात
दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी एनआयए आणि एटीएस यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरमधील काही दहशतवादी संघटनांशी याचा संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर मालेगाव येथून एका डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौक परिसरामध्ये आणि किराड पुरा भागामध्ये एनआयए तसेच एटीएसने छापेमारी केली. तर एनआयएकडून जालना येथील रामनगर चमडा बाजार परिसरात एका संशयिताची चौकशी करण्यात आली. एनआयएकडून सकाळी चार वाजेपासून संशयिताची चौकशी सुरु होती. चौकशी सुरू असलेला संशयित चामड्याचा व्यापारी असल्याचे समोर आहे. जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
0 Comments