Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत!
अजित पवारांविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळे या मतदारसंघात आता कोणाची वर्णी लागेतय हे जनतेचा कौल कोणाला मिळणार यावर अवलंबून आहे. दरम्यान, यावरून अजित पवारांनी महत्त्वाचं विधानस केलंय.
“काहींनी ठरवलं होतं की लोकसभेला ताईंना निवडून द्यायचं आणि विधानसभेला दादाला. त्याबद्दल जास्त बोलणार नाही. परंतु मागच्या वेळी पहिल्या नंबरच्या मताधिक्क्याने पाठवलं. त्यामुळे मी पहिल्या नंबरचा निधी आणला. बारामतीत ९ हजार कोटी निधी देण्याचं काम केलं. यावेळीही विधानसभेत चांगल्या मताधिक्क्यांने संधी द्या”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
आता तुम्ही माझं काम करा…
“आज मी तुमच्या नाही, माझ्या कामाकरता आलोय. माझी विनंती आहे की मी पाच वर्षे तुमची कामं करतोय, आता तुम्ही माझं काम करा. तुम्ही मला साथ द्या. मी पुढे पाच वर्षे तुमची कामं करण्यासाठी बांधिल आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत गाठीभेटींना सुरुवात केली आहे. अजित पवारांनीही निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लावली असून, दोन्ही पवारांचा दिवाळीचे सलग चार दिवस बारामतीतच मुक्काम असणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. मात्र, या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल देऊन त्यांना संसदेत पाठवले. त्यानंतर, ‘लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले, ही मोठी चूक झाली,’ अशी कबुली अजित पवार यांनी जाहीरपणे दिली.
भेटीगाठी, सभा आणि मेळावे
हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन ते चार दिवस बारामतीमध्ये मुक्कामी असल्याने दिवाळीत आणि दिवाळीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. दोन्ही नेते बारामती तालुक्यात सभाही घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार १, २, व ३ नोव्हेंबर, असे दिवाळीचे तीन दिवस पूर्ण बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा ते प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनीच जाहीर सभेदरम्यान दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील ५ नोव्हेंबर रोजी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, सुपे, मोरगाव व सोमेश्वर येथे सभा घेणार आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी व्यापारी, वकील व डॉक्टरांशीही ते संवाद साधणार आहेत.
0 Comments