-->

Ads

दिवाळीच्या तोंडावर फ्रॉड कॉलद्वारे गंडा, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचाही वापर

दिवाळीच्या तोंडावर फ्रॉड कॉलद्वारे गंडा, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचाही वापर


कोल्हापूर : मी मुंबई पोलिस बोलतोय, तुमचा मोबाइल क्रमांक बेकायदेशीर असून, ब्लॉक केला जाणार आहे. तुमचा आधार क्रमांक आमच्याकडे आहे. तुमचे बँक डिटेल्स द्या, एफडी कुठे केली आहे ते सांगा, यूपीआयचा वापर केला जातो का, असे नानाविध प्रश्नांचा भडीमार करून फ्रॉड कॉल येण्याचे प्रकार कोल्हापुरात वाढले आहेत. कॉलवरून अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी बोलण्याची भीती घालून बँकेची माहिती, एफडीवरील पैसे वर्ग करण्याचे सांगत सर्वसामान्यांना गंडा घातला जात आहे. दिवाळीमुळे लोकांच्या हातात बोनससह अन्य विविध मार्गाने पैसे येतात हे हेरून अशा कॉलची संख्या वाढली आहे.

मंगळवार पेठ परिसरात औषध विक्री करणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिस बोलतोय, असे सांगून व्हिडीओ कॉल आला. त्यामध्ये कॉल करणारा स्वतःला टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा (TRAI) कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमचे सिम कार्ड बेकायदेशीर असून, मुंबईतील एका दुकानातून खरेदी केले आहे. तुमचा आधार क्रमांकही माझ्याकडे आहे. या प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे, तुम्हाला दोन ते तीन तास बाहेर कोठेही जाता येणार नसल्याचे सांगितले.

मुंबई पोलिसांचे ओळखपत्रही संबंधिताने त्याला दाखविले. त्यानंतर त्या तरुणाची तीन तास चौकशी करण्यास सुरुवात केली. गुंतवणूक, खाते क्रमांक आदींचा तपशील विचारला. एफडीमधील पैसे काढून तत्काळ तुमच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा तुम्हाला मनी लॉण्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविले जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर दोन-तीन जणांनी त्याच्यासोबत संपर्क साधला. त्या तरुणाने ऑनलाइन कोणतेही व्यवहार करत नसल्याचे सांगितले. तो ऐकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील तुमच्यासोबत बोलणार असल्याचे सांगून एका व्यक्तिला बोलण्यास सांगितले. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार बँकेतील मित्रांना सांगितला. त्यांनी संबंधिताला खडेबोल सुनावल्यानंतर फ्रॉड कॉल बंद झाला.
शुक्रवार पेठेतील एका तरुणाला स्काइप व्हिडीओ कॉल जॉइन करण्यास सांगितले. त्यालाही बॅक डिटेल्स विचारून थोड्यात वेळात ओटीपी येईल, तो तत्काळ देण्याची मागणी केली. मात्र त्या तरुणाने ओटीपी दिला नसल्याने आर्थिक फसवणूक टळली.

कुठे करणार तक्रार?

फ्रॉड कॉल आल्यास टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनीकडे याविषयीची तक्रार द्या. त्यांच्याकडे त्या क्रमांकाची ओळख पटवा. त्यासह नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार करु शकता. सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करू शकता. जवळच्या पोलिस स्टेशनसह cybercrime.gov.in द्वारे ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात.

Post a Comment

0 Comments