रतन टाटांवर पारसी पद्धतीने होणार अंत्यसंस्कार, काय आहे प्रथा? अग्नी किंवा दफन न करता कसे होतात अंत्यसंस्कार?
पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची प्रथा फारच वेगळी आहे. पारसी लोकांमध्ये व्यक्तीच्या पार्थिवाला दफन करत नाही किंवा मृतदेहाला अग्नीही दिला जात नाही.
शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार
रतन टाटा यांचे काल (9 ऑक्टोबर) निधन झाले. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव आज (10 ऑक्टोबर) रोजी त्यांचे हलेकाय या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३.३० पर्यंत त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीएमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. यानंतर संध्याकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत दाखल होईल आणि ४.३० नंतर टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.
पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची प्रथा वेगळी
प्रत्येक धर्मात माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्याची पद्धती ही वेगळी असते. सर्वसामान्यपणे हिंदू किंवा मुस्लिम धर्मात मृतदेहाला दफन किंवा अग्नी दिला जातो. पण पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची प्रथा फारच वेगळी आहे. पारसी लोकांमध्ये व्यक्तीच्या पार्थिवाला दफन करत नाही किंवा मृतदेहाला अग्नीही दिला जात नाही. पारसी समाजातील एखाद्याचा मृत्यू झाला की त्याचा मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे दख्मा येथे नेला जातो.
दोखमेनाशिनी’ म्हणजे काय?
पारसी हा खूप जुना धर्म आहे. या धर्मात ३ हजार वर्षापासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला ‘दोखमेनाशिनी’ असे म्हटले जाते. एखाद्या पारसी व्यक्तीचं निधन झालं की त्या मृत व्यक्तीचं शरीर ‘दोखमेनाशिनी’ साठी एकांतात नेलं जातं आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे मृत शरीर गिधाडांसाठी सोडले जाते.
भारतात पारसी लोकांची लोकसंख्या कमी आहे. पण भारतातील सर्वाधिक पारसी हे मुंबई शहरात राहतात. मुंबईत पारसी लोकांची स्वतंत्र स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीला ‘टॉवर ऑफ साइलेन्स’ असं म्हटलं जातं. या टॉवर ऑफ सायलेन्सजवळ मृत शरीराला आणून ठेवले जातं. त्यानंतर ते मृत शरीर गिधाड येऊन खातात. पारसी समाजाच्या मते असं केल्यावरच त्यांना मुक्ती मिळते. पण आता मुंबईतील ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे.
पारसी लोकांमध्ये अशा पद्धतीने का केले जातात अंत्यसंस्कार?
पारसी धर्मात मृत शरीर हे अपवित्र मानले जाते. पारसी धर्मात पृथ्वी, जल आणि अग्नी या तिन्हीही गोष्टी अतिशय पवित्र असतात. त्यामुळे धार्मिक दृष्टीकोनातून मृतदेह जाळणे किंवा दफन करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. पारसी लोक हे पर्यावरणाबद्दल प्रचंड जागरुक असतात. त्यांच्या मते मृतदेह जाळल्याने अग्नी अपवित्र होतो. तर मृतदेह पुरल्याने पृथ्वी प्रदूषित होते. पारसी लोकांमध्ये मृतदेह नदीत तरंगवूनही अंत्यविधी करत नाही, कारण त्यामुळे पाणी प्रदूषित होते.
याच कारणामुळे पारसी लोकांचा मृतदेह हा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये उघड्यावर ठेवला जातो. यानंतर प्रार्थना केली जाते. प्रार्थनेनंतर मृतदेह गिधाड आणि गरुडांना खाण्यासाठी सोडला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया पारसी समाजाच्या परंपरेचा एक भाग आहे.
टॉवर ऑफ सायलेन्स नेमकं काय?
टॉवर ऑफ सायलेन्स ही एक गोलाकार जागा असते. या टॉवर ऑफ सायलेन्समध्ये मृतदेह उघड्यावर ठेवले जातात. त्यानंतर गिधाडे आणि गरुड तो मृतदेह खातात. पारसी समाजात ही परंपरा सुमारे ३ हजार वर्षांपासून सुरू आहे. पण गेल्या काही वर्षांत गिधाडांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे पारसी समाजातील लोकांना अंत्यसंस्कार करण्यात खूप अडचणी येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पारसी लोक ही प्रथा सोडून मृतदेह जाळून अंतिम संस्कार करत आहेत. अनेक पारसी लोक हे मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्स वर न ठेवता तो हिंदू स्मशानभूमी किंवा इलेक्ट्रिक स्मशानभूमीत घेऊन जातात आणि त्या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात.
0 Comments