-->

Ads

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा मुहुर्त ठरला? एकनाथ शिंदेंनी केले मोठे विधान

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा मुहुर्त ठरला? एकनाथ शिंदेंनी केले मोठे विधान

आता विधानसभा निवडणूक कधी होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत.


Maharashtra Assembly Election Date : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सध्या महायुती आणि महाविकासाआघाडी या दोन्हीही पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. तसेच या दोन्ही पक्षांकडून मतदारसंघांच्या चाचपणीही केल्या जात आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणूक कधी होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आता नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका कार्यक्रमादरम्यान निवडणुकांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. चांदिवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणुकांबद्दल वक्तव्य केले.

येत्या दोन महिन्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदेंनी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून द्या, असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी पुनर्वसन प्रकल्प, लाडकी बहीण योजना याबद्दलही भाष्य केले.

“झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट”

घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक महिना वाढ देण्यात आली आहे. लाडकी बहिण योजनेसाठी आता महिलांना सप्टेंबरपर्यत अर्ज करता येणार आहेत. मी देखील शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मी स्वतः चाळीत राहिलो आहे, गरीबी काय असते ते मला ठाऊक आहे. त्यामुळे गरिबांच्या अडचणी सोडवणे याला मी कायम प्राधान्य दिले आहे. मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे अशी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, मात्र आमच्या आधी मुख्यमंत्री असलेले त्यांच्या सुपुत्राने याला कधीच प्राथमिकता दिली नाही त्यामुळे आमचे सरकार आल्यावर आम्ही झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामाला वेग दिला आहे असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.


 

Post a Comment

0 Comments