Chandrashekhar Bawankule : दोन दिवस शाह-फडणवीसांसोबत होतो, बावनकुळे म्हणतात हिट अँड रनमध्ये माझा मुलगा असेल तर त्याला...
अकोला : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावर नोंद असलेल्या ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरणावर भाष्य केले आहे. मी कधी पोलिसांना फोन केला नाही, मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन दिवस होते, पण मी त्यांनाही काही बोललो नाही, असा दावा बावनकुळेंनी केला. गाडी चालवणाऱ्यावर कुठला गुन्हा आणि गाडीत बसणाऱ्यांवर कुठले गुन्हे याचा तपास सुरु आहे, मी एका गोष्टीवर ठाम आहे, चूक ज्या कोणाची असेल, मग तो माझा मुलगा असूदे किंवा सर्वसामान्यांचा, कडक कारवाई झाली पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले. अकोल्यात पत्रकार परिषद घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
नागपूर हिट अँड रन प्रकरणावर प्रश्न विचारला असता, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की खरं तर मी यावर जास्त बोलू नये. पण मी खुल्या मनाचा आहे... कुठला विषय टाळत नाही. माझ्या वर्चस्वातून पोलीस तपासावर प्रेशर येणार नाही. एखादी गोष्ट शेवटी मी बोललो... बावनकुळेंनी भूमिका खरीखुरी मांडलीस, तरी विरोधक म्हणतात की मी मुलाला वाचवतोय, असं ते म्हणाले.मी पहिल्याच दिवशी सांगितलं, की मी कधी पोलिसांना फोन केला नाही, एकदा फक्त काय घटना घडली याची माहिती घेतली होती. मी गृहमंत्री-केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत दोन दिवस होतो, मी त्यांना काही बोललो नाही. मी एका गोष्टीवर फर्म आहे, ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सामाजिक किंवा राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी हे बघायला हवं. पोलिसांनी कुणाचाही मुलगा असो, माझा किंवा सर्वसामान्य माणसाचा, शिक्षा समान असावी, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
आता एकच भाग आहे गाडी चालवणाऱ्यावर कुठला गुन्हा, गाडीत बसणाऱ्यांवर कुठले गुन्हे याचा तपास सुरु आहे. गाडी चालवणारे आणि बसणारे लक्षात आले आहेत, त्यामुळे कारवाई होईल, असेही बावनकुळे म्हणाले.
0 Comments