कोलकाता डॉक्टर तरुणी हत्या प्रकरणाचा तपास CBI करणार, उच्च न्यायालयाचे आदेश
Kolkata doctor rape and murder case : या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, याआधी उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला या प्रकरणाची केस डायरी दुपारी १ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीदरम्यान, रुग्णालय प्रशासनाने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. रुग्णालय प्रशासनाच्या अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
रुग्णालय प्रशासनानेच गुन्हा नोंदवायला हवा होता. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली होती. याशिवाय. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या इतर अनेक जनहित याचिका (पीआयएल) ही दाखल करण्यात आल्या होत्या.
देशभरात निषेध
या घटनेचा देशभरातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी निषेध केला. पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील निवासी डॉक्टरांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केल्याने ओपीडी सेवा आणि आपत्कालीन नसलेल्या शस्त्रक्रियांवर परिणाम झाला. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या (फोर्डा) आवाहनावरून हा संप सुरू झाला. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप संपणार नसल्याचे फोर्डने म्हटले आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
तत्पूर्वी, याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश टीएस शिवगनम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने तपासात काही त्रुटी असल्याचे आढळून आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य संदीप घोष यांचे म्हणणे नोंदवले गेले आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केली, त्यावर राज्य सरकारच्या वकिलांनी नकारार्थी उत्तर दिले. आरजी कार हॉस्पिटलच्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिलेल्या घोष यांना काही तासांतच कलकत्ता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्राचार्यपदी कसे बहाल करण्यात आले, असा सवाल त्यांनी केला.
0 Comments