अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली, मात्र त्याच्या आई वडिलांनी अक्षयची काहीच चूक नसल्याचं म्हटलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य (Badlapur Crime ) केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी वेगळाच दावा केला आहे.
आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा दावा काय?
बदलापूर (Badlapur Crime) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन (Mobile Phone) संपर्क साधण्यात आला. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी असा दावा केला आहे की अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नाही. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अक्षयचे आई वडील काय म्हणाले?
अक्षयचे आई-वडील म्हणाले, “अक्षयला फक्त १५ दिवस झाले होते कामाला लागून. १७ तारखेला त्याला पोलिसांनी धरलं. अक्षयला धरुन नेलं इतकंच आम्हाला सांगण्यात आलं. पोलिसांनी अक्षयला मारहाण केली. माझ्या लहान मुलालाही पोलिसांनी मारलं. चौकीत गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे. अक्षय फक्त ११ वाजता बाथरुम धुवायला जात होता. बाकी कुठलंही काम दिलेलं नव्हतं. त्यानंतर शाळेत झाडू मारायचा. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की झाडू मारायला जायचो. आमचं सगळं कुटुंबच तिथे कामाला होतं. माझ्या मुलाने हा काही प्रकार केलेला नाही.” असं अक्षयच्या आईने सांगितलं.
आम्हाला मारहाण करण्यात आली
“आमच्या घरात लोक शिरले, आम्हाला मारहाण करण्यात आली आणि घराबाहेर ढकलून दिलं. तुम्ही इथे राहूच नका असं आम्हाला सांगितलं. आमचं कुणी काही ऐकूनच घेतलं नाही.” असं अक्षयचे वडील म्हणाले. एबीपी माझाला फोनवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत अक्षय शिंदेच्या आई वडिलांना हा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.
0 Comments