-->

Ads

MLC Election Result: कोणी काय कमावले अन् कोणी काय गमावले, विधान परिषद निवडणुकीचा 'हिशोब' एका क्लिकवर

MLC Election Result: कोणी काय कमावले अन् कोणी काय गमावले, विधान परिषद निवडणुकीचा 'हिशोब' एका क्लिकवर


Maharashtra Politics: या निकालाच्या पार्श्वभूमिवर विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने काय कमावले आणि कोणी काय गमावले याबाबत जाणून घेणार आहोत.


नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 जागांसाठी मतदान झाले, ज्याचा निकालही कालच लागला. यामध्ये महायुतीने 11 पैकी 9 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीच्या पदरात अवघ्या दोन जागा पडल्या.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर महायुतीसाठी हा निकाल सुखावणारा होता. तर दमदार यश मिळवणाऱ्या महाविकास आघाडीसाठी हा निकाल जमिनीवर आणणारा होता असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या निकालाच्या पार्श्वभूमिवर विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने काय कमावले आणि कोणी काय गमावले याबाबत जाणून घेणार आहोत.

भाजप

ही विधान परिषद निवडणूक 12 जागांसाठी होणार होती. यामध्ये भाजपचे सर्वाधिक पाच आमदार विजयी झाले. यात भाजपकडे प्रत्यक्ष 103 आमदार असताना त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला 26 मते म्हणजेच एकूण 130 आमदारांची साथ मिळाली. त्यामुळे या निवडणुकीतून भाजपचे विधान परिषदेतील बळ तर वाढलेच पण त्यांना अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवता आला आहे. त्यामुळे जर भाजपने विधान सभा निवडणुक स्वबळावर लढवायचे ठरवले तर हे अपक्ष आमदार भाजपकडून मैदानात उतरू शकतात.

काँग्रेस

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या साथीने काँग्रेसने दमदार यश मिळवत राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. लोकसभेतील या यशामुळे राज्यात काँग्रेसची गळती थांबेल अशी अपेक्षा असताना तब्बल 7 ते 8 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. परिणामी महाविकास आघाडीचे जयंत पाटील पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेसने जरी लोकसभेत यश मिळवले असले तरी संघटना म्हणून काँग्रेस डळमळीत झाल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान या क्रॉस व्होटिंगमुळे येत्या विधान सभा निवडणुकीत निष्ठावंत उमेदवारांची निवड ही काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे अनेक आमदार त्यांना सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार अशा चर्चा सुरू होत्या. पण विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवल्याने स्पष्ट झाले की अजित पवारांचा एकही आमदार फुटला नाही आणि त्यांनी आपल्या नेत्याशी प्रमाणिक राहण्याचा निर्णय घेतला. आमदारांच्या या भूमिकेमुळे ते अजित पवारांना सोडून जातील याबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर 40 आमदारांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे अवघे 12 आमदार राहिले. विधान परिषदेचा उमेदवार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा नसल्याने पवारांच्या राष्ट्रवादीने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. यामध्ये पवारांच्या सर्व 12 आमदारांनी जयंत पाटील यांना मतदान केल्याने त्यांचे आमदारही पक्षाबोरबर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही निवडणूक पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी ना नफा ना तोटा अशी होती.

शिवसेना एकनाथ शिंदे

ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर लोकसभेला डावललेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी देत शिंदे यांनी त्यांच्याबरोबर येणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही असा संदेश कार्यकर्त्यांना देत आपले नेतृत्त्व भक्कम करण्यात यश मिळवले.

पुढे प्रत्यक्ष निवडणुकीत शिंदे यांना त्यांचे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी 46 मतांची गरज होती आणि त्यांच्याकडे फक्त 38 मते होती. अशा परिस्थितीत शिंदे यांनी साम, दाम, दंड आणि भेद वापरत दोन्ही उमेदवारांना विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळवली. त्याचबरोबर विधान परिषदेत आपले संख्याबळही वाढवले.

शिवसेना उद्धव ठाकरे

2022 च्या विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघे 16 आमदारच राहिले. त्यामुळे यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत ठाकरे यांना उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 6 अतिरिक्त मतांची गरज होती. ठाकरेंच्या उमेदवाराला काँग्रेसने आपली शिल्लक मते दिली आणि त्यांचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. या विजयाबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेला आता विधान परिषदेत एक शिलेदार मिळाला आहे. त्याचबरोबर काँग्रेसने शिवसेनेला मदत करत लोकसभा निवडणुकीत सांगलीतील बंडखोरीचा रोषही कमी करण्यात यश मिळवले.

Post a Comment

0 Comments