निवृत्तीतून माघार घेत David Warner खेळणार चॅम्पियन्स ट्रॉफी? निवड समिती अध्यक्षांचा खुलासा
वॉर्नरने यावर्षाच्या सुरुवातीलाच कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधूनही निवृत्त झाला होता.
मात्र, त्याने निवृत्तीबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की तो आता फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे, पण जर निवड झाली, तर तो पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्येही खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
त्यामुळे वॉर्नर पुनरागमन करणार का? असे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत होते. अखेर बेली यांनी त्यावर पूर्णविराम लावताना सांगितले की वॉर्नरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून त्याचा आता भविष्यात विचार केला जाणार नाही.
बेली म्हणाले, 'तो कधी जोक करेल, हे तुम्हाला समजत नाही, मला वाटतं तो आताही थोडी ढवळाढवळ करतोय.'
'आम्हाला इतकं माहित आहे की डेव्हिड निवृत्त झाला आहे आणि त्याची तिन्ही प्रकारात शानदार कामगिरी झाल्याबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. नक्कीच तो पाकिस्तानमध्ये (चॅम्पियन्स ट्रॉफी) संघात असणार नाही.'
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने त्यांच्या संघात सालामीसाठी वॉर्नरच्या जागेवर कुपर कॉनोली आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांना निवडले आहे. याशिवाय मॅथ्यू वेडच्या जागेवर जोश इंग्लिसला ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी२० संघात यष्टीरक्षक म्हणून निवडण्यात आले आहे.
याबद्दल बोलताना बेली यांनी सांगितले की वेड निवृत्त झालेला नाही, तो पुनरागमन करू शकतो, पण यावेळी इंग्लिसला संधी द्यायची होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला इंग्लंड आणि स्कॉटलंड दौऱ्यासाठी पूर्ण विश्रांती दिली आहे. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांना टी२० मालिकांसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाला स्कॉटलंडविरुद्ध तीन टी२० सामने खेळायचे आहेत, तर इंग्लंडविरुद्ध तीन टी२० आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.
ऑस्ट्रेलिया टी-२० संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झाम्पा
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा
0 Comments