Ajit Pawar: "आता काय जमिनी विकून निधी देऊ का?"; कॅबिनेट बैठकीत अजित पवार मंत्र्यांवर का संतापले?
कॅबिनेटमध्ये खडाजंगी-
राज्याच्या विकासासंदर्भात चर्चा चालू असताना काही मंत्र्यांनी निधीबद्दल तक्रार केली. हे ऐकून अजित पवारांनी खडसावले. आपल्या मतदारसंघात कामे करण्यासाठी निधी मिळत नाही, यावरून मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यांनी धक्कादायक विधान केले आहे. दोन महिन्यांवर निवडणुका असताना आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी निधीची गरज आहे. या वादामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडलं?
आज मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावित या मंत्र्यांनी निधीची मागणी केली होती, पण मंत्र्यांनी मागितलेल्या अतिरिक्त निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला.
राज्यात सध्या सात महत्त्वाच्या योजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. त्यामुळे जवळपास एक लाख कोटी रुपये त्यात खर्च होत आहेत. त्यामुळे निधीसाठी पैसे कुठून उभारणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.
आज मंत्रिमंडळात निधीच्या संदर्भात अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी आपली नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील तणाव वाढला आहे आणि आगामी निवडणुकांसाठी हा वाद कसा मिटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.
0 Comments