मोदींच 'हे' करु शकतात, कारण ते ग्लोबल लिडर आहेत'', पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचं पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळासाठी अभिनंदन करताना पॅलेस्टाईनचे पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही जागतिक नेते आहात. मानवाधिकार आणि शांततेला महत्त्व देणारे राष्ट्र म्हणून गाझामधील नरसंहार संपवण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे.
मुस्तफा पुढे म्हणाले, "भारताने तात्काळ युद्धविरामासाठी सर्व राजनैतिक माध्यमांचा वापर केला पाहिजे. यामुळे आमचे दुःख कमी करण्यात मदत होईल. पॅलेस्टिनी नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि आमच्यावरील हल्ले थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणला पाहिजे. अत्याचारांवर कारवाई झालीच पाहिजे.
भारताने गेल्या वर्षी तात्काळ युद्धबंदीची मागणी करणाऱ्या यूएनजीएच्या ठरावाला पाठिंबा दिला होता. मात्र, भारताने याबाबत स्पष्टपणे आवाहन केले नाही. इस्राइलला दिलेल्या आपल्या संदेशात भारत सरकारने इस्राइल-हमास संघर्षामुळे होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचा तीव्र निषेध केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा आदर करण्याचे आवाहन केले जात आहे.
मुस्तफा यांनीही पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, पॅलेस्टिनी मुद्द्यांना आणि पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांना भारताने सातत्याने पाठिंबा दिला आहे.
गाझामध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यात आठ इस्रायली सैनिकांचा मृत्यू
दरम्यान, इस्त्रायली लष्कराने शनिवारी सांगितले की, दक्षिण गाझा येथे झालेल्या स्फोटात त्यांचे आठ सैनिक ठार झाले आहेत. गेल्या काही महिन्यांतील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता. दक्षिण रफाह शहरात शनिवारी स्फोट झाला. या हल्ल्यामुळे इस्रायली निदर्शकांच्या युद्धविरामाच्या आवाहनाला चालना मिळेल.
इस्राइल आणि पॅलेस्टाईनमध्ये आठ महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमास आणि इतर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले होते आणि 250 लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यानंतर इस्राइलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केले. जानेवारीमध्ये गाझामध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 21 इस्रायली सैनिक ठार झाले होते.
0 Comments