-->

Ads

फलंदाजांचा कर्दनकाळ बुमराह 'एक्सप्रेस'! २४ पैकी तब्बल २० निर्धाव चेंडू अन् ३ बळी

 

फलंदाजांचा कर्दनकाळ बुमराह 'एक्सप्रेस'! २४ पैकी तब्बल २० निर्धाव चेंडू अन् ३ बळी


Jasprit Bumrah News : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुरुवातीपासून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम कामगिरी केली. सुपर-८ मधील आपल्या पहिल्या सामन्यात त्याने अफगाणिस्तानविरूद्ध पुन्हा एकदा चमक दाखवली. त्याने त्याच्या स्पेलमधील २४ पैकी तब्बल २० चेंडू निर्धाव टाकण्याची किमया साधली. बुमराहने ४ षटकांत केववळ ७ धावा देत तीन महत्त्वाचे बळी घेतले. यंदाच्या विश्वचषकातील त्याची सातत्यपूर्ण कामगिरी कायम आहे. 




दरम्यान, आयर्लंड आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात बुमराह सामनावीर ठरला. विशेष बाब म्हणजे जसप्रीत बुमराहने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये आतापर्यंत १५ षटकांत केवळ ४ चौकार दिले असून ८ बळी घेतले आहेत. याशिवाय त्याची सरासरी ही ३.४६ अशी राहिली.


बुमराहची या विश्वचषकातील कामगिरी -
२/६ विरूद्ध आयर्लंड 
३/१४ विरूद्ध पाकिस्तान
०/२५ विरूद्ध अमेरिका
३/७ विरूद्ध अफगाणिस्तान


अफगाणिस्तानला नमवून सुपर-८ मध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना भारताला कर्णधार रोहित शर्माच्या (८) रूपात सुरुवातीलाच टीम इंडियाला एक मोठा झटका बसला. त्यानंतर विराट कोहलीने (२४) साजेशी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, अफगाणिस्तानकडून पुन्हा एकदा राशिद खानने कमाल केली. त्याने विराट कोहली, रिषभ पंत आणि शिवम दुबे यांना आपल्या जाळ्यात फसवले. याशिवाय फझलहक फारूकीने रोहित आणि जडेजाला तंबूत पाठवले. मात्र, सूर्यकुमारच्या खेळीने भारताला तारले. त्याने ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ५३ धावांची स्फोटक खेळी केली. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने निर्धारित २० षटकांत ८ बाद १८१ धावा केल्या. या धावांचा बचाव करताना भारताकडून जसप्रीत बुमराहने आणि अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३-३ बळी घेतले, तर कुलदीप यादव (२) आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांना घाम फुटला. ते निर्धारित २० षटकांत सर्वबाद केवळ १३४ धावा करू शकले आणि ४७ धावांनी सामना गमावला. 

Post a Comment

0 Comments