अजितदादांच्या प्रकरणावर अण्णा हजारे यांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, मला धक्काच…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे कोर्टात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी शरद पवार गटानेही अजितदादांची पाठराखण केली आहे. आता या प्रकरणावर पहिल्यांदाच अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल करण्यासंदर्भात वेळ घेतला अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यावर अण्णा हजारे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणात माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधत आहेत, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
मी बोललोच नाही
शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट देण्यात आल्याच्या मुद्द्यावर मी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मी कोर्टात जाईल असंही म्हटलं नाही. तरीही माझ्या नावाने प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. माझं नाव आल्याचं ऐकून मला धक्का बसला आहे, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे
ज्यांना माहिती ते बोलतील
15 वर्षापूर्वी मी या प्रकरणात आवाज उठवला होता. मात्र, आता यात माझा कुठलाही संबंध नाही, असं सांगतानाच अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीट संदर्भात ज्यांना माहिती आहे ते बोलतील. माझा कुठलाही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार आणि इतरांची नावे आली होती. या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अजितदादांना क्लीन चिट दिली आहे. अजितदादां विरोधात कोणतेच पुरावे नाहीत, असं पोलिसांचं म्हणणं होतं.
0 Comments