रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस
अभिनेत्री रवीना टंडनने एका व्यक्तीविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. चुकीच्या गोष्टी सांगून प्रतिमा खराब केल्याचा आरोप तिने या व्यक्तीविरोधात केला आहे.
Raveena Tandon News: अभिनेत्री रवीना टंडनने एका व्यक्तीला मानहानीची नोटीस धाडली आहे. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे रवीना आणि तिच्या ड्रायव्हरवर काही लोकांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दावा केला होता की रवीनाच्या कारने एका वयोवृद्ध महिलेला धडक दिली आणि रवीनाने त्यांना मारहाणही केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पण आता रवीना टंडनच्या कायदेशीर सल्लागारांनी हा अपमानास्पद मजकूर शेअर केल्याबद्दल या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याच्या दिशेने पाऊल पुढे टाकले आहे. रवीना टंडनने मोहसीन शेख नावाच्या व्यक्तीला मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्याने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता, ज्यामध्ये हिट अँड रन घटनेच्या रात्री अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत होती, असा आरोपही त्याने केला होता. या प्रकरणी रवीनाने संबंधित व्यक्तीला 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे.
याबाबत बोलताना अभिनेत्रीची वकील सना रईस खानने सांगितले की, "अलीकडे रवीनाला खोट्या तक्रारीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. जे सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट झाले आणि कोणतीही तक्रारही नोंदवण्यात आली नव्हती. पण एक व्यक्ती जो पत्रकार असल्याचा दावा करत आहे, त्याने घटनेबाबत चुकीची माहिती 'X' वर व्हायरल केली, जी दिशाभूल करणारी आहे".
पुढे सनाने असेही म्हटले की, "व्हायरल केलेल्या खोट्या बातम्या हा केवळ रवीनाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. हे खोटे सतत पसरवण्यामागील कारण म्हणजे खंडणी उकळणे आणि लोकप्रियता मिळवण्याची इच्छा असल्याचे दिसत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सध्या आम्ही आवश्यक ते कायदेशीर पाऊल उचलत आहोत, जेणेकरून न्याय मिळेल आणि ही अपमानास्पद मोहीम सुरू ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल".
जून महिन्याच्या सुरुवातीस सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रवीना टंडनच्या कारने धडक दिली व त्यानंतर तिने आणि तिच्या ड्रायव्हरने मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते, ज्यामध्ये यापैकी कोणतीही घटना न घडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे
0 Comments