शरद पवारांच्या सटाणामधील सभेत भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली. सटाण्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना वादळी वारे सुटले होते, या वाऱ्यामुळे सभेच्या व्यासपीठावरील बॅनर कोसळत होता.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार व अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनाही या अवकाळी व बदलत्या हवामानाचा फटका बसल्याचं दिसून आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह काही नेत्यांच्या सभाही अवकाळीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय बॅनर कोसळून मोठी दुर्घटना झाली. आता, पुन्हा एकदा बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाणा सभा सुरू असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला. मात्र, तरीही पवारांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं. मात्र, यावेळी, व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.
मुंबईत महाकाय बॅनर कोसळून मोठी दुर्घटना झाली. वादळी वाऱ्याच्या तडाख्याक घाटकोपर येथील जाहिराताचा बॅनर कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत.मुंबईतील ही घटना ताजी असतानाच राजकीय सभेदरम्यानही डिजिटल बॅनर कोसळल्याची घटना घडली. शरद पवारांच्या सटाणामधील सभेत भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली. सटाण्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना वादळी वारे सुटले होते, या वाऱ्यामुळे सभेच्या व्यासपीठावरील बॅनर कोसळत होता. शरद पवार भाषण करत असलेल्या पाठिमागील बॅनर पडला. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही जखम झाली नाही. व्यासपीठावर जे कार्यकर्ते होते, त्यांनी हा बॅनर वरचेवरच घेतल्याने अनर्थ टळला. मात्र, बॅनर कोसळल्याची घटना समजाच शरद पवारांनी आपले भाषण उरकते घेतले.
शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे :-
महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न, या भागातील प्रश्न मांडले जायचे. उत्तम शेती कशी करायची हे या भागातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले. नाशिकचा नावलौकिक त्यामुळेच सर्वत्र वाढल्याचे सांगत शरद पवारांनी सटाण्यातील भाषणाला सुरुवात केली. देशात सध्या मोदी राज्य आहे.,विविध जिल्ह्यात आज कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे. मात्र, कांद्याची निर्यात केंद्र सरकारने बंद केली आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते, कांद्यावरील निर्यातबंदी उठवायची ही त्यांचीच जबाबदारी असते. पण, या सरकारला सहन होत नाही. आमचे राज्य होते तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून आले होते, शरद पवार होष मे आवो अशा घोषणा दिल्या. त्यावेळी, मी दिल्लीत गेलो अन् कांदा निर्यातबंदी उठवली होती. आताच्या सरकारला त्याची चिंता नाही. कांद्याला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही, द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. मात्र, मोदी म्हणतात द्राक्ष,व डाळिंबाला भाव दिले, पंतप्रधान खोटे बोलतात आणि आमच्यावर टीका करत आहेत, असे पवार यांनी म्हटले.
फुकट धान्याच्या गप्पा मारू नका
धान्य मोफत देण्याच्या घोषणा करतात आणि शेतकऱ्यांच्या लागणाऱ्या साहित्याची किंमत वाढवली जाते. हा देश धान्य निर्यात करणारा होता, आज आयात करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही फुकट धान्य देतो अशा गप्पा मारू नका, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींवर पलटवार केला. शेतकऱ्याच्या घामाने देशातील धान्याचे गोडवून भरले म्हणून तुम्ही मोफत वाटत आहे. शेतकऱ्यांचे जीवन समृध्द कसे होईल ते बघा. केवळ आमच्यावर टीका करण्यात ते धन्यता मानतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून म्हटले होते काय झाले. दोन कोटी नोकऱ्या देणार होते काय झाले. सत्तेत बसण्याचा अधिकार तुम्हाला, नाही देश संकटातून जातो आहे. देशाचा इतिहास तपासून बघा. यशवंतराव चव्हाण यांनी मिग विमानाचा कारखाना नाशकात उभारला. गांधीच्या विचाराने हा देश चालला पाहिजे इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने देश चालला पाहिजे, पण मोदी तसे करणार नाहीत. चीन आपल्या देशात घुसतोय त्याकडे त्यांचे लक्ष नाही. देशाचे रक्षण करायला ठोस पाऊले उचलणे गरजचे आहे, पण मोदी ते करत नाहीत. म्हणून या निवडणुकीत भाजपचा पराभव करा, असेही पवार यांनी म्हटले.
0 Comments