गुजरातमधील राजकोट शहरात शनिवारी ‘गेमिंग झोन’ला भीषण आग लागल्याने 12 लहान मुलांसह 30 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या घटनेनंतर शहरातील सर्व गेमिंग झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.टीआरपी गेम झोन’मध्ये विविध खेळांसाठी उभारण्यात आलेल्या फायबरच्या घुमटाला शनिवारी दुपारी आग लागली आणि तो कोसळला. आग लागली तेव्हा तेथे लहान मुलांसह अनेकजण खेळण्यात दंग होते. त्यांना स्वत:चा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. मृतदेहांचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्यामुळे आणि शनिवार असल्याने घटनास्थळी लहान मुलांसह मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते. ते सर्वजण खेळत असताना आगीचा भडका उडाला. त्यात लहान मुलांसह अनेक जण होरपळले. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. गुजरातमधील राजकोट येथील गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानं मला खूप दुःख झालंय, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय. तसंच लहान मुलांसह ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबांप्रती मी शोक व्यक्त करते. सुटका करण्यात आलेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असंही त्यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले की, "राजकोटमधील आगीच्या घटनेमुळं मी अत्यंत दुःखी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती माझ्या संवेदना. जखमींसाठी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्याचं काम करत आहे."
घटनेचं गांभीर्य पाहून राज्य सरकार अलर्ट झालंय. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलंय की, "राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत महापालिका आणि प्रशासनाला तातडीनं बचाव आणि मदतकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत." तसंच मुख्य अग्निशमन अधिकारी आय.व्ही. खेर म्हणाले की, "आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहोत, अद्याप कोणी बेपत्ता असल्याची माहिती नाही. जोराचा वारा यामुळं आग विझवण्यात अडचण येत होती."
0 Comments