-->

Ads

लोकलमुळे आणखी एक बळी, 7 दिवसात तीन डोंबिवलीकरांनी गमावला जीव

रेल्वे मार्गाचा विस्तार करा, लोकलच्या संख्येत वाढ करा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून वारंवार केली जात असतानाही रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचं दिसत आहे.


मुंबई:

रेल्वे मार्गाचा विस्तार करा, लोकलच्या संख्येत वाढ करा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून वारंवार केली जात असतानाही रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचं दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून कार्यालयाच्या वेळेत बदल करणं आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान गेल्या सात दिवसात तीन प्रवाशांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  त्यामुळे लोकलमधील वाढती गर्दी हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

डोंबिवली स्टेशनवरून लोकल पकडून प्रवास करणं तीन डोंबिवलीकरांच्या जीवावर बेतलं आहे. हे तिन्ही अपघात डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडले आहेत. अवधेश दुबे, रिया राजगोर आणि राहुल अष्टेकर या तिघांना रेल्वे प्रवासादरम्यान आपला जीव गमवावा लागला. यातील दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात व तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी डोंबिवली पश्चिमेकडील अवधेश दुबे यांचा सकाळी डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला होता. 29 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील रिया राजगोरे या तरुणीचा कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला. डोंबिवली पश्चिमेकडील श्रीधर म्हात्रे वाडी येथील राहुल पुरुषोत्तम अष्टेकर ( 49 ) यांचा शनिवार 27 तारखेला रात्री आठ वाजता दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



ऑफिसच्या वेळा बदलण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन...
अपघात आणि गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या संख्येत वाढ करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे. दुसरीकडे लोकलला होणारी गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे. विविध कंपन्यांना याबाबत आवाहन केल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत बदल केला नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. मात्र या वादात प्रवाशांचे हकनाक बळी जात आहे. वेळेत यावर उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.   

Post a Comment

0 Comments