-->

Ads

Raj Thackeray: आशिष शेलार यांच्या भेटीमुळं एनडीएबाबतचा प्रश्न, राज ठाकरेंनी पाच शब्दात विषय संपवला, म्हणाले...

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. निवडणूक

आयोगानं मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला तीन तीन महिने लावलं जातं यावरुन आक्रमक भूमिका घेतली. शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामासाठी हजर होऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. एनडीएसोबत जाण्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी निवडणुकीच्या वेळी बोलू म्हणत अधिक भाष्य करणं टाळलं.
मुंबई महानगरपालिकेकडील ४१३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात येत आहे. एवढे शिक्षक बाहेर काढले तर मुलांना शिकवणार काय? निवडणूक आयोग पाच वर्ष काय काम करतो. पाच वर्ष लोक का तयार करत नाहीत. आयत्यावेळी शिक्षकांवर जबाबदारी टाकली जाते. शिक्षकांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला जातोय पण निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येत नाही. पाच वर्षानं दरवेळी निवडणुका येतात, तुम्हाला यंत्रणा तयार करता येत नाही का?, असा सवालही ठाकरे यांनी केला.


शिक्षक हे निवडणुकीची काम करण्यासाठी आलेत का? शिक्षक हे मुलांना शिकवण्यासाठी आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं. शिक्षकांनी कुठंही रुजू होऊ नये. निवडणूक आयोगानं नवी लोकं तयार करावीत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. शिक्षकांवर शिस्तभंगाची कोण कारवाई करतंय ते पाहायचं आहे. निवडणूक आयोगासोबत आमची लोकं बोलतील आणि मग नंतर बोलेन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.कोर्टानं निवडणुकीच्या कामासाठी पाच दिवस परवानगी दिलेली असताना शिक्षक तीन तीन महिने का हवेत, असं राज ठाकरे म्हणाले.

आम्ही निवडणूक आयोगाला विचारु पाच वर्ष काय काम करता? निवडणूक आयोगाचा आयुक्त तिकडे असतो, तो पाच वर्ष काय करतो. निवडणुकीच्या वेळी माणसं घेता मग पाच वर्ष काय करता? ही काही पहिली निवडणूक आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. खरतंर निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे. पाच वर्ष झोपा काढता आणि ऐनवेळी जागे होता, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.


Post a Comment

0 Comments