-->

Ads

अमित ठाकरेंना पाहून मनसैनिकांना आली बाळासाहेबांची आठवण

Amit Thackeray: मनसैनिकांना बाळासाहेबांच्या त्या फोटोची पुन्हा आठवण झाली. असं नेमकं काय घडलं? याबद्दल जाणून घेऊया.  


देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची विशेष शैली होती. त्यांच्या एका आवाजावर मुंबई बंद होण्याची धमक होती. बाळासाहेबांचा गाडीच्या टपावर उभं राहून भाषण देतानाचा फोटो त्यावेळच्या प्रसंगाची आठवण करुन देतो. दरम्यान आज मनसैनिकांना बाळासाहेबांच्या त्या फोटोची पुन्हा आठवण झाली. असं नेमकं काय घडलं? याबद्दल जाणून घेऊया.  

पुणे विद्यापीठावर मनसेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले. यावेळी अमित ठाकरे लाल गाडीवर उभे राहून तरुणांना संबोधताना दिसत आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मोर्चानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर अमित ठाकरेंचा फोटो शेअर केला जातोय. 

मनसैनिकांनी 2 फोटो जोडले आहेत. यातील पहिला फोटो 1969 सालचा आहे. ज्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गाडीवर उभे राहून कार्यकर्त्यांना संबोधन करत आहेत. तर दुसरा फोटो मनसेने नेते अमित ठाकरे यांचा आहे. ज्यामध्ये अमित ठाकरे गाडीवर उभे राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

ठाकरे... ही तुलना नाही तर वारसा आहे... अशा पद्धतीची टॅगलाईन मनसैनिकांनी लिहीली आहे. सोशल मीडियावर मनसे पदाधिकाऱ्यांकडून पोस्ट करण्यात येत आहेत. यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियादेखील येत आहेत. 

पुण्यात अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांसाठी हजारो मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठावर मोर्चा निघाला.विद्यापीठात नवीन वसतीगृह बांधण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे घ्यावेत...विद्यापीठात विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळावा...अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.बारावीची परीक्षा असल्याने शांततेत मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं निवेदन अमित ठाकरेंनी कुलगुरूंना दिलं.

राज साहेबांनी जबाबदारी दिली तर ते म्हणतील ती निवडणूक लढवेन, लोकसभा, विधानसभा, नगरसेवक, सरपंचसुद्धा होईन, असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र आपली निवडणूक लढवायची इच्छा नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यातील शिक्षकांना निवडणुकीची कामे लावली जात असल्याचा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.  आता निवडणूक आयोगाने या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय केला आहे. यावरअमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिली आहे. शालेय शिक्षकांना निवडणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा मुद्दा चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मीडियासमोर मांडला होता. राजसाहेबांच्या आदेशानुसार दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका आम्ही आग्रहपूर्वक मांडली तसेच केवळ शिक्षकांवर अवलंबून न राहता पर्यायी व्यवस्था उभारताना माजी शासकीय कर्मचारी आदींनाही सामावून घ्यावे, अशी सूचना करण्यात आली होती, असे अमित ठाकरेंनी सांगितले.


Post a Comment

0 Comments