-->

Ads

मॉरिसनं अमरेंद्रसमोर विचित्र अट ठेवलेली; बॉडीगार्डच्या पत्नीचा दावा; खून प्रकरणाला नवं वळण?

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यानंतर हल्लेखोरानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.


मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. स्वयंघोषिक समाजसेवक मॉरिस नोरोन्हानं अभिषेक यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक केली आहे. अमरेंद्रच्या पत्नीनं या प्रकरणात धक्कादायक दावे केले आहेत. मॉरिसनं अमरेंद्रला काम देताना त्याच्यासमोर एकक विचित्र अट ठेवली होती असा तिचा दावा आहे.

मॉरिसनं डिसेंबर २०२३ मध्ये अमरेंद्र यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानं अंगरक्षकाची नोकरी देऊ केली. २६ डिसेंबरला मॉरिसनं अमरेंद्र यांना कामावर ठेवलं. पण त्यासाठी त्यानं एक विचित्र अट ठेवली. अमरेंद्र कामावर असताना त्याचं पिस्तुल कार्यालयात असलेल्या लॉकरमध्ये ठेवायचं. त्याची चावी अमरेंद्र यांच्याकडेच असेल अशी ती अट होती. मॉरिसनं ऍडव्हान्स म्हणून अमरेंद्र यांना ३० हजार रुपये दिले, असा दावा अमरेंद्र यांची पत्नी सोनी मिश्रा यांनी केला.

माझे पती दररोज पिस्तुल घरी आणायचे. त्यांनी तसा करार मॉरिससोबत केला होता, असं सोनी यांनी सांगितलं. अभिषेक घोसाळकर यांच्यावर हल्ला त्यावेळी मॉरिसनं अमरेंद्रला रुग्णालयात त्याच्या आईला भेटण्यासाठी पाठवलं होतं. या घडामोडी पाहता मॉरिसनं अतिशय थंड डोक्यानं योजना रचून अभिषेक यांची हत्या केल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. त्यातून महत्त्वाची माहिती उघड होऊ शकते.

मॉरिसनं मला त्याच्या कार्यालयातील लॉकरमध्ये पिस्तुल ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर त्यानं मला रुग्णालयात पाठवलं. मी त्याच्या कार्यालयातून गेल्यानंतर कार्यालयात गोळीबार झाला. तो माझ्याच पिस्तुलातून झाल्याचं मला नंतर समजलं. मॉरिसनं लॉकरची डुप्लिकेट चावी तयार केल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती, अशी माहिती अमरेंद्रनं पोलिसांना दिली. आपल्यावर अन्याय होतोय. माझ्यासोबत चुकीचं घडतंय. मला फसवलं जातंय, असा दावा अमरेंद्रनं पोलिसांच्या ताब्यात असताना केला. पोलीस कर्मचारी त्याला कारमध्ये बसवत असताना त्यानं आरडाओरडा केला.



Post a Comment

0 Comments