-->

Ads

नवभारत के शिल्पकार पुरस्काराने जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मान

 

मुंबई : नवभारत ग्रुप ऑफ पब्लिकेशन नवभारत व नवराष्ट्र वृत्तपत्र समूह यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवभारत के शिल्पकार या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचा सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

पालघर जिल्ह्यातील भिवंडी येथील निलेश सांबरे यांनी जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील वंचित व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आरोग्य, रोजगार आणि इतर सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

या संस्थेमार्फत पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८ मोफत सी.बी.एस.ई. स्कुल सुरु असून अनेक गोर गरीब कष्टकरी यांची हजारो मुले आज मोफत शालेय शिक्षणासोबतच JEE-NEET यांसारखे महाविद्यालयीन शिक्षणही घेत आहेत. त्याचबरोबर त्यांनी दिव्यांग मुलांची निवासी शाळा सुरु केली असून या शाळेत १५१ मुले दत्तक घेवून त्यांचे पालकत्व संस्थेने स्वीकारले आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २५ लाख वह्यांचे मोफत वाटप केले जाते.

त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली सारख्या लहानश्या गावात त्यांचे १३० बेड्सचे रुग्णालय २४ तास मोफत सुरु असून तेथे सर्दी खोकल्यापासून कॅन्सरच्या रुग्णांन पर्यंत उपचार मिळतात. ठाणे पालघर जिल्ह्यात दररोज मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन होत असून आतापर्यंत लाखो रुग्णांना याचा लाभ झाला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये ४५ ठिकाणी MPSC/UPSC अकॅडमी मोफत वाचनालये सुरु असून ठाणे व पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरु करण्यात आली आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाची , राहण्याची आणि जेवणाची देखील मोफत सुविधा आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्रांमधून आतापर्यंत हजारो विद्यार्थी शासकीय सेवेत विविध पदांवर रुजू झाले आहेत.

कोकणातील शेतकरी सक्षम व्हावा या हेतूने दरवर्षी शेतकऱ्यांना ५ लाख मोफत फळरोपांचे वाटप तसेच कुक्कूटपालन व दुग्धव्यवसायास चालना देऊन विविध मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

या पुरस्काराबद्दल निलेश सांबरे म्हणाले, "हा पुरस्कार मला माझ्या संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या सामाजिक उपक्रमांसाठी मिळाला आहे. या पुरस्कारामुळे मला अधिक प्रेरणा मिळाली आहे. मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वंचित व गरीब नागरिकांसाठी अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन."

राज्यपाल रमेश बैस यांनी निलेश सांबरे यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, निलेश सांबरे यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.

Post a Comment

0 Comments