-->

Ads

आम्हाला संपत्तीत वाटा हवा! आईचं पार्थिव चितेवर, लेकींचा वाद विकोपाला, ८ तास लोटले, अखेर...

महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या तीन लेकींमध्ये वाद सुरू झाला. जमिनीच्या वाटणीवरुन झालेल्या भांडणामुळे अंत्यविधी खोळंबला. जवळपास ८ ते ९ तास ग्रामस्थ स्मशानभूमीत होते.


लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मथुरेत आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये संपत्तीवरुन वाद झाला. स्मशानभूमीत आईच्या पार्थिवावर अंत्यविधी सुरू असतानाही भांडण सुरुच होतं. भांडण मिटत नाही तोपर्यंत आईचं पार्थिव तसंच होतं. त्याला मुखाग्नी देण्यात आला नाही. यामध्ये जवळपास ८ ते ९ तास वाया गेले. या घटनेची चर्चा आता सगळीकडे सुरु आहे. मृत महिलेच्या लेकींच्या वर्तणुकीची चर्चा सध्या सर्वत्र आहे.

मथुरेतील मसानी येथील स्मशानभूमीत हा प्रकार घडला. ८५ वर्षांच्या पुष्पा यांचं निधन झालं. यानंतर तिच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरुन वाद सुरू झाला. त्यामुळे कित्येक तास पार्थिवावर पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. अंत्यविधी करण्यासाठी आलेले भटजी स्मशानभूमीतून निघून गेले. महिलेच्या लेकींमधला वाद काही केल्या मिटत नव्हता. त्यामुळे स्मशानभूमीत जमलेले नातेवाईक, ग्रामस्थ वैतागले. अखेर स्टॅम्प पेपर आणण्यात आला. जमिनीची वाटणी करण्यात आली. त्यानंतर अंत्यविधी पूर्ण झाले.

पुष्पा यांना मुलगा नव्हता. त्यांना तीन मुली आहेत. मिथिलेश, सुनीता आणि शशी अशी तिघींची नावं आहेत. पुष्पा गेल्या काही दिवसांपासून मिथिलेश यांच्या घरी राहत होत्या. मिथिलेश यमुनेपलीकडे असलेल्या लोहवन गावात वास्तव्यास आहेत. मिथिलेश यांनी आईला फसवून एक एकर जमीन विकल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी पुष्पा यांचं निधन झालं. मिथिलेशच्या नातेवाईकांनी पुष्पा यांचं पार्थिव मोक्षधाम स्मशानभूमीत नेलं. याची माहिती मिळताच पुष्पा यांच्या अन्य दोन लेकी, सुनीता आणि शशी यांनी स्मशानभूमी गाठली. मोठ्या बहिणीवर आरोप करत त्यांनी आईचे अंत्यविधी रोखले. आईच्या संपत्तीत वाटा मागत दोघी मिथिलेशसोबत भांडू लागल्या.

आईची उरलेल्या संपत्ती आमच्या नावे करण्याची मागणी दोन बहिणींनी लावून धरली. संपत्ती नावावर झाल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. पण मिथिलेश तयार नव्हती. बहिणींमध्ये बराच वेळ वाद झाला. याची माहिती स्मशानभूमीत जमलेल्या काहींनी पोलिसांना दिली. पोलीस पोहोचले. त्यांनी तिघींना समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. अखेर संध्याकाळी सहा वाजता वाद मिटला. तीन बहिणींमध्ये लेखी करार झाला. आईची शिल्लक असलेली संपत्ती शशी आणि सुनीता यांच्या नावे करण्यात आली. त्यानंतर अंत्यविधी झाले. या सगळ्यामध्ये ८ ते ९ तास गेले.


Post a Comment

0 Comments