-->

Ads

पुढारी युथ आयकॉन २०२४ पुरस्कारने जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचा सन्मान

 ठाणे : दैनिक पुढारीच्या वृत्तपत्राच्या ८५ व्या वर्धापनदिना निमित्त युथ आयकॉन २०२४ या कार्यक्रमात पुढारी युथ आयकॉन २०२४ हा पुरस्कार देऊन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश  सांबरे यांचा गौरव करण्यात आला. 


दैनिक पुढारीच्या वृत्तपत्राच्या ८५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत ठाणे येथील गडकरी रंगातन येथे नववर्षाच्या प्रारंभी आज दि. १ जानेवारी २०२४ रोजी दुपारी 12 च्या दरम्यान युथ आयकॉन २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यात सामाजिक , शैक्षणीक , सांस्कृतिक ,क्रीडा तसेच उद्योग यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या युवाशक्तीचा गौरव आणि सन्मान करून त्यांना प्रेरित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचा पुढारी युथ आयकॉन २०२४ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

जिजाऊ संस्था ही गेली १५  वर्ष शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कोकणाच्या पालघर , ठाणे , रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ५ पाच जिल्ह्यांमध्ये दिवस-रात्र सक्रीय आहे. २००८ साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र ही संस्था निलेश सांबरे यांनी स्थापन केली.  आपल्या व्यवसायातल्या उत्पन्नातून ८० टक्के रक्कम ही समाजसेवेसाठी समाजाच्या हितासाठी निस्वार्थी भावनेने ते खर्च करत आहेत आणि म्हणूनच इथल्या व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवणारा चेहरा म्हणजेच निलेश सांबरे ही त्यांची ओळख बनली आहे.

संस्थेच्या माध्यमातून सांबरे यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावात आपल्या वडिलांच्या नावाने श्री. भगवान महादेव सांबरे हे १३० बेड्सचे २४ तास नि:शुल्क रुग्णालय सुरु केले आहे.  तसेच आदिवासी व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे आपल्या आईच्या नावाने सौ.भावनादेवी भगवान सांबरे ही सी.बी.एस.ई. बोर्ड शाळा  मोफत सुरु केली आहे.  ठाणे पालघर जिल्ह्याच्या  दुर्गम भागात संस्थेच्यावतीने अश्या ८ सीबीएसई निःशुल्क शाळा चालवण्यात येत आहेत.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून कोकण प्रांतातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी २५ लाख वह्यांचे मोफत वाटप केले जाते.  जिजाऊ दिव्यांग मुलांची मोफत निवासी शाळा असून यात आजपर्यंत १०५ आदिवासी दिव्यांग मुले दत्तक घेवून त्यांचे पालकत्व संस्थेने स्वीकारले आहे.

कोकणातील विभागातून प्रशासकीय स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी घडावेत यासाठी ४५ जिजाऊ MPSC/UPSC अकॅडमी मोफत वाचनालयांची सुरुवात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.  जिजाऊ MPSC व UPSC अकॅडमी झडपोली येथील स्वप्निल माने हे सन २०२१ च्या  केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण देशामधून ५७८ रँकने उत्तीर्ण झाले आहेत . इतकेच नाही तर IAS अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचा जिजाऊ संस्थेचा मानस आहे.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये असलेल्या क्रिडागुणांना वाव मिळावा यासाठी  जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातुन झडपोली येथे  संस्थेच्या सुसज्ज मैदानासह मॅट सुविधा देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. जिथे खेळाडूंना १२ ही महिने प्रशिक्षण दिले जाते. 
प्रत्येक महिला ही सक्षम झालीच पाहीजे. यासाठी २ हजार ३३६ महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारप्रवण करणारे अनेक विविध उपक्रम राबवले जातात.  कोकणातील शेती ही जोडधंद्यासह फायद्याचीच ठरावी यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना ५ लाख मोफत फळरोपांचे वाटप करण्यात येते. कुक्कूटपालन व दुग्धव्यवसायास चालना देऊन सक्षम शेतकरी घडविण्याचा मानस आहे. आजवर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून लाखो नागरिकांनी या विविध उपक्रमांचा लाभ घेतला आहे.

यांसारखे संस्थेचे अनेक उपक्रम हे विनामुल्य चालवले जातात . म्हणूनच निलेश सांबरे यांच्या या अभूतपूर्व कार्याची दखल घेत पुढारी परिवाराने त्यांचा पुढारी युथ आयकॉन २०२४ हा पुरस्कार देऊन सन्मान केला. 
यावेळी भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशात सध्या ६६ % लोक हे तरुण आहेत. याच युवाशक्तीच्या कर्तृत्ववान कामिगिरीतून आपला देश जागतिक महासत्ता होणार आहे. यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे योगदान अधिक मोलाचे ठरेल असा आशावादही पुढारी परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे ,आमदार संजय केळकर, कार्यकारी संपादक ,विवेक गिरधारी, पुढारी न्यूज चॅनल संपादक  तुलसीदास भोईटे, निवासी संपादक शशी सावंत , शिवसेना नेते नरेश म्हस्के यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments