-->

Ads

एमआयडीसी, महसूल विभागातील काही अधिकारी लॅण्ड माफिया: रामदास काकडे

संपूर्ण तळेगाव एमआयडीसी बंद करण्याचा शेतक-यांचा इशारा


प्रतिनिधी रेखा भेगडे :तळेगाव दाभाडे : दि. २ (वार्ताहर) तळेगाव एमआयडीसीतील टप्पा क्र. १ ते २ नवलाख उंबरे ते बधलवाडी जोडरस्ता व टप्पा क्र. १ ते ४ नवलाख उंबरे, जनरल मोटर्स ते आंबळे जोडरस्ता या जोडरस्त्यांसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी एकरी दोन कोटी रूपये दर न दिल्यास संपूर्ण एमआयडीसी बंद करण्याचा इशारा शेतक-यांचे नेते रामदास काकडे यांनी शुक्रवारी (दि.१) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. एमआयडीसी आणि महसूल विभागातील काही अधिकारी लॅण्ड माफिया असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मागण्या मान्य न केल्यास शेतकरी आंदोलन करतील यावेळी सुमारे दहा ते बारा गावातील हजारो शेतकरी एमआयडीसीला होणारा वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि रस्ते बंद करतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बाधित शेतक-यांच्या सभेत ‘संपूर्ण तळेगाव एमआयडीसी बंद’ आंदोलनाच्या ठरावाला एकमुखाने मंजुरी देण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, माजी उपसभापती शांताराम कदम, ॲड.दत्तात्रेय शेटे, दिनकर शेटे, सरपंच मोहन घोलप, आंबळे ग्रामपंचायतीच्या सरपंच आशा कदम, उद्योजक राजेश म्हस्के, तानाजी पडवळ, गिरीश खेर, तात्यासाहेब कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रामदास काकडे यांनी तळेगाव एमआयडीसीच्या स्थापनेपासून शेतक-यांनी शासनाबरोबर घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेचा आढावा घेतला. ते म्हणाले, की तळेगाव एमआयडीसीतील जमिनीच्या दराबाबत भूमी संपादन अधिनियमानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि बाधित शेतकरी सदस्यांची १३ जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत शासनाकडून एकरी १ कोटी १८ लाख रूपये, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुश यांनी १ कोटी ०४ लाख रूपये तर एमआयडीसीने तो फक्त ७३ लाख रूपये एकरी असे दर प्रस्तावित केले होते. मात्र खातेदार शेतक-यांनी एकरी दोन कोटी रूपये दर देण्याची मागणी केली होती. असे असताना, शेतक-यांची एकरी दोन कोटी रूपयांची मागणी घुडकावत एकरी केवळ ७३ लाख रूपये देण्याबाबत नोटीस शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहे. या नोटिशीनंतर शेतकरी संतप्त झाले आहेत. 

याच रस्त्यामुळे तळेगाव चाकण महामार्गावरील भार होणार कमी

काकडे पुढे म्हणाले, की तळेगाव आणि चाकण एमआयडीसीना जोडणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून त्या अंतर्गत नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिंडेवाडी, आंबी, आंबळे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे ही गावे समाविष्ट आहेत. तळेगाव आणि चाकण एमआयडीसीला जोडणारा मार्ग लवकर व्हावा, अशी मागणी देखील होत होती. त्यानुसार तळेगाव एमआयडीसी व चाकण एम‌आयडीसी यांना जोडणारा फेज १ व फेज २ रस्ता, व तळेगाव फेज १ ते ४ याचा प्रकल्प अहवाल तयार झाला. मात्र या जोडणाऱ्या रस्त्याचे संपादन गेली २३ वर्षे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या गुंडगिरी प्रवृतीमुळे थांबले आहे. हे रस्ते झाल्यास तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक या मार्गे वळविल्याने यावरील भार कमी होईल.

 या पूर्वी आंबी, नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिंडेवाडी, निगडे, कल्हाट येथील शेतक-यांच्या संपादित झालेल्या जमिनींची काही रक्कम बाकी आहे. परताव्याची जमीनही मिळालेली नाही. काही शेतक-यांची जमीन वगळण्याचे प्रस्ताव एमआयडीसी कार्यालयात, मंत्रालयात पडून आहेत; त्यावर कोणताही निर्णय होत नाही, असे काकडे यांनी यावेळी सांगितले. आंबी व कातवी येथील जमिनीवर संपादनासाठी २३ वर्षे शेरा आहे. यावेळी शेतकरी नारायण बधाले, रवी शेटे, गिरीश खेर, निवृती शेटे, शांताराम कदम, दिनकर शेटे यांनी अधिका-यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या.


 

Post a Comment

0 Comments