-->

Ads

‘हुंड्यासाठी त्यांनी माझ्या मुलीचे हातपाय बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारलं’

 


"लग्न होऊन तीन साडेतीन महिने झाले. त्यानंतर घरच्या पुजेसाठी मुलगी माहेरी आली. सासरी त्रास होतो आहे म्हणाली. तेव्हा तिच्या सासरहून दिराचा फोन आला की तिला माघारी पाठवा. समजावून परत पाठवलं ते कायमचंच. आम्हांला माहित असतं मुलीला इतका त्रास होतोय तर आम्ही तडजोड केली असती,” सुरेखा गडदरेचे वडिल सांगत होते.

त्यांची मुलगी सुरेखा गडदरेचं प्रेत तिच्या सासरच्या घराजवळच्या शेततळ्यात तरंगताना सापडलं. बाहेर काढलं तेव्हा तिचे हातपाय बांधलेले असल्याचं दिसलं. सुरेखाचा मृत्यू झाला तेव्हा तिचं वय होतं 19 वर्षांचं. आणि लग्न होऊन झाले होते जेमतेम तीन साडेतीन महिने.

दौंड जवळच्या गिरीम येथे शेती आणि मेंढपाळ म्हणून काम करणाऱ्या नामदेव करगळ यांनी त्यांच्या मुलीचं सुरेखाचं लग्न लावून दिलं होतं ते मुलाला नोकरी आहे तो बॅंकेत काम करतो म्हणून.

बारामती मधल्या मासाळवाडी मध्ये राहणाऱ्या कुटुंबात सुरेखा लग्न होऊन गेली. पण जेमतेम तीन साडेतीन महिन्यांच्या संसाराचा शेवट झाला तो दुर्दैवी पद्धतीने.

नेमकं काय घडलं?

सासरच्यांकडून होणारी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सुरेखाला तिच्या सासरच्या लोकांनी शेततळ्यात दोन्ही हात बांधून बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

24 डिसेंबरला सुरेखाचं प्रेत घराजवळच्या शेततळ्यात सापडलं. त्यानंतर सुरेखाच्या पालकांच्या तक्रारीवरून बारामतीमधल्या वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये तिचा नवरा भाऊसाहेब गडदरे, सासू ठकुबाई गडदरे, नणंद आशा कोकरे आणि नणंदेचा नवरा सोनबा कोकरे या चौघांना अटक केली आहे.

या चौघांविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 (खून) , 304 (ब) (हुंडाबळी) आणि 498 (अ) हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

लग्न झाल्यापासूनच मनाप्रमाणे हुंडा न मिळाल्याने तिचा छळ होत असल्याचं तिच्या पालकांचं म्हणणं आहे. सुरेखा तिच्या सासूसोबत बारामती मधल्या मासाळवाडी येथे सासरच्या घरी राहत होती. तर तिचा नवरा पु्ण्यात कात्रज परिसरात एका बॅंकेत कामाला होता.

तिची नणंद आणि नणंदेच्या नवऱ्याचं सासरी कायम जाणं-येणं होतं. हे सगळे मिळून सुरेखाचा छळ करत असल्याचा आरोप सुरेखाच्या पालकांनी केला आहे.


तिचे वडील नामदेव करगळ बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "लग्नानंतर तिच्या कुटुंबीयांनी चारचाकी घेतली होती. त्यासाठी माहेरहून पैसे आण, दागिने आण म्हणून मुलीला म्हणायचे. मुलीने आम्हाला बराच काळ हा प्रकार सांगितला नाही. नुकतीच घरी वास्तुशांती होती तेव्हा ती माहेरी आली तेव्हा मात्र तिने सासरच्यांकडून होत असलेल्या छळाचा पाढा वाचला.”

तेव्हा तिच्या दिराने फोन केल्याने तिला पुन्हा सासरी पाठवल्याचं करगळ सांगतात. "पोरीच्या दिराचा फोन आला आणि तो म्हणाला की तिला आणून घाला. तिला समजावलं आणि लावून दिलं. आम्हाला आधी कळलं असतं तर काही तडजोड केली असती. पूजाचा मावसभाऊ सोडायला गेला तर त्यावरुन संशय घेतला. ते तिला म्हणायचे तुझं काळं तोंड दाखवू नको. पोरगी इथं आल्यावर रडत होती.”

घटना घडली त्याचा आदल्या दिवशी देखील सुरेखाच्या मामाने फोन केल्यावर ती रडतच असल्याचं तिचे वडिल सांगतात. शनिवारी 23 डिसेंबरला मामाशी बोलणं झालं आणि रविवारी 24 डिसेंबरला सुरेखाचं प्रेत शेततळ्यात तरंगत्या अवस्थेत सापडलं.

करगळ सांगतात, "तिच्या नवऱ्याने 6 वाजता फोन केला होता. सकाळ सकाळ ती काही झोपलेल्या जागेवर नाही म्हणून. भावाला फोन केला. ते म्हणाले कुठे गेली पहा. मग मी फोन केला होता की सापडतीये का पहा. तर ते म्हणाले की नाही सापडली. पण थोड्या वेळाने मी फोन केला की ती अशी हातपाय बांधलेली सापडली असं त्यांनी सांगितलं.”

पोलीस काय म्हणाले?

याप्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सुरेखाचे कुटुंबीय करत आहेत.

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सह-पोलिस निरिक्षक सचिन काळे म्हणाले, “मयत महिला हात बांधलेल्या अवस्थेत आढळली. तीन महीने झाले होते लग्न होऊन. तिच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिली आहे की तिचा हुंड्यासाठी छळ होत होता. आम्ही संबंधित आरोपींना अटक केली आहे. त्याप्रमाणे तपास सुरु आहे.”

बारामतीचे पोलीस उप-अधीक्षक गणेश इंगळे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले , "या मुलीच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला हातपाय बांधून पाण्यात बुडवून मारले असं तिच्या पालकांनी म्हणले आहे. याबाबत आम्ही चारही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.”

कायदा काय सांगतो?

हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 अधिनियमातील कलम 2 अन्वये बुंडा या शब्दाच्या व्याख्येनुसार कोणत्याही एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षाला लग्नाच्या वेळी किंवा त्या आधी किंवा नंतर दिलेली रक्कम किंवा संपत्ती म्हणजे हुंडा.

या कायद्याच्या कलम चार अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्याला कमीत कमी 6 महिने तर 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

तर कलम 3 अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीतकमी 5 वर्षं कारावासाची आणि कमीत कमी 15 हजार रुपये किंवा हुंड्याच्या मुल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त आहे इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.

यामध्ये आता काही सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींची मंजूरी मिळून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. या सुधारणांनुसार पतीने किंवा तिच्या नातेवाईकांनी तिला क्रूर किंवा छळाची वागणूक दिल्याने आत्महत्या किंवा खून झाला असेत तर अशा प्रकाराला बळी पडलेल्या महिलेच्या नाततेवाईकाने किंवा कोणत्याही लोकसेवकाने पोलिस स्टेशनला कळवले तर गुन्हा दाखल करणे बंधनकारक करणे.

एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यापासून सात वर्षांच्या आत मृत्यू झाला आणि तो संशयास्पद असेल तर त्याची चौकशी करुन पोस्टमार्टम करणे बंधनकारक. एखाद्या आत्महत्या केलेल्या महिलेने लग्नानंतर सात वर्षांच्या आत आत्महत्या केली असेल आणि तिचा छळ झाल्याचे स्पष्ट झाले तर या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकेल


नॅशनल क्राईम रेकॅार्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये, महिलांविरोधातील अत्याचाराच्या देशभरात एकूण 4,45,256 केस दाखल झाल्या. 2021 च्या तुलनेत ही महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढले आहे. यापेकी 31.4 % प्रकरणं ही कौटुंबिक हिंसाचाराची आहेत. तर 2022 मध्ये एकट्या महाराष्ट्रात हुंडाबळींची संख्या 180 एवढी आहे.

या प्रकरणाविषयी बोलताना वकील रमा सरोदे म्हणाल्या , "कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार वाढत आहेत. कोव्हीडच्या साथीच्या काळात आकडेवारीवरुन हे प्रकार वाढल्याचं दिसलं. आपण कितीही पुढारलेले म्हटलं तरी काही रुढी-परंपरा पाळल्या जात आहेत. आता हुंडा मागण्याची पद्धत पारंपरिक राहिलेली नाही. लग्नाची बोलणी करण्याच्या वेळीच पैसे मागितले जातील असं नाही. तर आम्ही हाताळलेल्या काही प्रकरणांमध्ये घर घेण्यासाठी कर्ज मंजूर होत नाही म्हणून मुलीच्या घरच्यांकडून पैसे घेणे असेल किंवा कमावत्या महिलेचे बॅंकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तिच्या ताब्यात न देणं आणि ती उधळपट्टी करते असं त्याचं जस्टिफिकेशन देणं असे प्रकार घडतात.

“इकॅानॅामिक व्हायलन्सचे प्रकार वाढत चालले आहेत. बारामतीतले हे प्रकरण तर थेट हुंडाबळीची केस आहे. कायदे आहेत. पण शिक्षा होणे गरजेचे आहे. कन्व्हीक्शन कमी असल्याने लोकांना धाक नाही. त्यामुळे भीती कमी होते आणि लोकांना खोट्या केस आहेत असं वाटतं. आता कोर्टावर जबाबदारी आहे. ही केस कशी लढली जाईल यावर त्याचा निकाल ठरेल. कनव्हिक्शन वाढणे आवश्यक आहे.”

Post a Comment

0 Comments