Kashedi Ghat : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव एलंगेवाडी येथे इंडियन गॅस कंपनीच्या टँकरने पेट घेतल्याने दोन तासांपासून ठप्प आहे
रत्नागिरी, 29 जुलै : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात वारंवार दरड कोसळण्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. मात्र, एका वेगळ्या कारणामुळे तब्बल दोन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटामध्ये मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या रिकाम्या एलपीजी गॅसच्या टँकरला अपघात होऊन टँकरला भीषण आग लागली. या अपघातामुळे महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघात झाल्यानंतर महाड एमआयडीसी तसेच खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. खेड नगरपालिकेच्या आणि महाड एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आठ वाजल्यापासून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अपघातामुळे कशेडी घाटात दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करतांना पावसाळ्यात नेहमीच कशेडी घाटातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. येथील वळणावळणाचा घाट आणि महामार्गावर दरड माती खाली येणे या घटना पावसाळ्यात घडत असतात त्यामुळे अपघातही होतात. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामाची पाहणी देखील केली होती. कशेडी बोगद्याची एक मार्गीका या महिनाअखेर खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात नेहमीच अपघात होत असतात. मुंबई गोवा महामार्गानं सिंधुदुर्गात जातान कशेडी घाट हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सिंधुदुर्गात जाणा-या चाकरमान्यांसाठी हा इंटरव्हल आहे. कारण पनवेल पासून 150 किमीचा टप्पा या घाटात पूर्ण होतो. हा घाट उतरलो की, रत्नागिरी जिल्हा सुरू होतो. नागमोडी वळणांचा डोंगराळ भाग आणि त्यातून चौपदरी महामार्ग उभारताना बरीच आव्हानं होती. ती पार करत या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाल्यात जमा आहे. या घाटात थांबून रवींद्र चव्हाण यांनी अखेरच्या टप्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील केली होती.
0 Comments