-->

Ads

अगम्य ज्ञानाची उपलब्धि संशोधकांमुळेच सहजशक्य - सरन्यायाधीश उदय लळीत

रेखा भेगडे:तळेगाव दाभाडे: समाजाकडून संशोधकांची उपेक्षा होते ही नेहेमी अनुभवायला येणारी गोष्ट आहे.समाजाचा हा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे आणि त्यासाठी बहुभाषिक ब्राह्मण संघाने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या प्रांगणात विद्यावाचस्पतींचा केलेला गौरव हा सर्वार्थाने गौरवास प्राप्त ठरावी अशी घटना असल्याचे मत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केले. 

बहुभाषिक ब्राह्मण संघ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने  इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित विद्या वाचस्पती (पीएचडी प्राप्त) गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर,उपाध्यक्ष सुधीर राईलकर, सचिव सतीश भोपळे,

खजिनदार सतीश देशपांडे,इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, माजी राज्यमंत्री संजय (बाळा ) भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या दिनदर्शिकेचे आणि पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बहुभाषिक ब्राह्मण संघांचे अध्यक्ष सुरेश साखवळकर सरांनी केले.
यावेळी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांना परिस स्पर्श झालेल्या अनेक नामवंत व्यक्तीमत्वांच्या अनेक पैलूंचा आढावा घेतला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे यांनी आपल्या मनोगतात मानवजातीला समग्र ज्ञानाच्या,प्रगतीच्या  एका छताखाली एकत्र आणायचे असेल तर संशोधन महत्त्वाचे असे संगितले. इंद्रायणी महाविद्यालय हे अशा चांगल्या आणि समाजकेंद्री चळवळींचे केंद्र बनायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करीत या कामाची खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली असे मत व्यक्त केले.याप्रसंगी मावळ तालुक्यातील व महाराष्ट्रातील प्राथमिक स्वरूपात ६५ पीएच.डी. पदवी प्राप्त करणाऱ्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला. 

या सर्वांचे वतीने प्रतिनिधीक स्वरूपात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व नामवंत साहित्यिक डॉ. संभाजी मलघे यांनी सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपशीलवार प्रा. जयंत जोर्वेकर यांनी केले तर आभार ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष सुधीर राईलकर यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments