-->

Ads

गोंधळलेले सरकार आणि कंटाळलेली जनता?" पुसद मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी!

याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद 

महागाव प्रतिनिधी:-  संजय जाधव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध शेतकरी नेते मनीषजी जाधव सह अनेक शेतकऱ्यांनी 10 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या प्रर्वावर शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करत उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद यांच्या परिसरामध्ये झुणका भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केल्याची सर्वदूर वार्ता पसरली.  खरंच सरकार शेतकऱ्यांच्या  हिताचे धोरण राबवते की, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसते? याचाच मेळ आज जनतेला लागत नाही.  त्यामुळे एकंदरीत एवढी खराब परिस्थिती महाराष्ट्र सरकारची केव्हाही झाली नव्हती. म्हणून कंटाळलेली जनता आता सांगत आहे की, हे सरकार गोंधळलेलं  आहे. म्हणून हा लेख प्रपंच!

 शेतकरी नेते मनीष जाधव हे आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. सकाळी सकाळी त्यांच्याशी संवाद केले असता त्यांनी शेतकऱ्याच्या प्रचंड व्यथा आणि वेदना धीरगंभीर आवाजात मांडल्या. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती शिवाराचे वाळवंट झालेले असून ओल्या दुष्काळामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. कंगाल झालेला शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे होरपळून निघत असताना मात्र त्याकडे शासन साफ दुर्लक्ष करताना दिसत आहे. शासनाचे कोणतेही धोरण आज रोजी शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. हे खेदाने सांगावे लागते. सन 1972 च्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भीषण गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही महानायक वसंतराव नाईकसाहेबांनी समर्थपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करून दाखविला. आज तसे नेते मंत्रिमंडळात दिसून येत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. असे सांगून ते पुढे  म्हणाले की, आज रोजी यवतमाळ जिल्ह्यात नदी ,नाले, विहिरी पाण्याने ओसंडून वाहत आहेत. मात्र सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही. कार्पोरेट सरकार शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रचंड उदासीन असल्यामुळे विदर्भाच्या बळीराजाची स्मशानभूमी झाली असल्याचा घणाघात शेतकरी नेते मनीष जाधव यांनी व्यक्त केला. ढगफुटीने खरीप हंगामाची वासलात लागली. असून आता शेतकऱ्याची भिस्त रबी हंगामावर आहे. जिल्ह्यात या रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र किमान पाच लाख हेक्टर वर आहे. सध्या गहू ,हरभरा पेरणीची लगबग सुरू आहे. पाणी मुबलक असूनही दुर्दैवाने पुरेसा वीज अभावी सिंचन करता येत नाही. वीज वितरणाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी हतबल झाला आहे‌. शेतकऱ्यांना आठवड्यातून केवळ तीनच दिवस सिंचना करता वीज मिळते. विजेचा लपंडाव, सक्तीचे व अघोषित भारनियमन आणि कमी दाबाच्या वीज मुळे शेतकऱ्यांच्या हातातून रब्बी हंगामही जाणार की काय? अशी विदारक अवस्था  सध्या जिल्ह्यात निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगुन सरकार बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्याविषयी असलेली जबरदस्त तळमळ त्यांच्या शब्दातून दिसत होती.कारण त्यांच्या बोलण्यातिल चढ-उतार आवाजावरून लक्षात येत होतं. खरंच सरकारला शेतकऱ्याच्या हिताचे धोरण राबवण्यामध्ये अडचण आहे  की, ते जाणून बुजून शेतकऱ्याची वाट लावण्यासाठी दुर्लक्ष करत आहे? अशी शंका यायला हरकत नाही. सरकार सर्वच आघाडीवर फेल झाल्याची ओरड आज सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे. शेतकऱ्याची दैना जर बघितली तर डोळ्यात आसवे येतात. यावर्षी शेतकऱ्यांची काळी दिवाळी झाली. आणि काल-परवा पुसद मतदारसंघातील काही गावांना भेटी देण्याचा योग आला. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना बघून मनाला प्रचंड वेदना झाल्या. गतिमान सरकार असल्याची ओरड फार मोठ्या जाहिरातीतुन दिसून येते. परंतु सरकार  गतिमान असल्याचे कुठेही दिसत नाही. अशी बोलकी प्रतिक्रिया काल लोहरा येथील एका शेतकऱ्याने दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे  हे गतिमान आहेत .परंतु त्यांच्या आजूबाजूला असलेली चौकडी त्यांना कामच करू देत नाही अशी प्रतिक्रियाही मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्याने मागच्या दौऱ्याच्या प्रसंगी दिली होती. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना माणसाच्या मनाला प्रचंड वेदना होतात. आज शेतकऱ्याच्या कापसाला, सोयाबीनला भाव नाही. जे लोक कापसाला आणि सोयाबीनला  भाववाढ मागण्यासाठी विधानसभा बंद पाडत होते, (त्यामध्ये आघाडीवर होते तेंव्हाचे आमदार आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस)  हिवाळी अधिवेशनामध्ये प्रचंड मोर्चे काढत होते. तेच लोक आज शासनात बसलेले आहेत. मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आहेत. पण त्यांना शेतकऱ्याच्या व्यथा, वेदना अजिबात दिसत नाही. त्यांना दिसत नाही तर दिसत नाही. निदान इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाला सुद्धा दिसायला पाहिजे. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियाची अशी वाईट अवस्था झालेली आहे की, ते सकाळी उठून एकमेकाची उणी-दुणी  काढणाऱ्या नेत्याच्या घरी कॅमेरे लावून बसतात. मग तो त्याला शिव्या देतो आणि तो त्याला शिव्या देतो. माझंच खरं, माझंच खरं .अशी फुकटची दिवसभर करमणूक. शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या शेतीचे चित्रीकरण, किंवा आज शेतकरी कसा जगतो आहे हे  दाखवण्यापेक्षा मुंब्र्यातील शिवसेना शाखा कशी पाडण्यात आली हे दाखवण्यामध्येच इलेक्ट्रॉनिक मीडिया दंग आहे. यापूर्वी काय पत्रकारिता होती आणि काय त्यावेळेसचे नेते होते. याचे ज्वलंत उदाहरण द्यायचं असेल तर महानायक वसंतराव नाईकसाहेब मुख्यमंत्री असताना अर्थतज्ञ विजय तेंडुलकर यांनी नाईकसाहेबांना प्रश्न विचारला की, तुमचे कृषीधोरण अत्यंत चांगले आहे .परंतु ते तुम्ही मंत्रालयातून बसुन कसे राबवणार..?  त्यावर नाईकसाहेब ताडकन उतरले.... मी जरी मंत्रालयात बसलो असेल तरीही माझे मन शेतकऱ्याच्या बांधावर आहे. आणि सर्व महाराष्ट्र राज्य त्यांनी त्यावेळी पिंजून काढला होता.  धन्य ते मुख्यमंत्री..!

 माननीय मुख्यमंत्री साहेब या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. तुमच्या कामाबाबत किंवा दरड कोसळून दबलेल्या आदिवासी वाडीत तुम्ही पायी चालत तिथे सकाळीच पोहोचलात ते सर्व उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राने  बघितले आहे.  परंतु मुख्यमंत्री महोदय  शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना आपण जाणून घ्या.. अशी आर्त हाक शेतकरीच नाही तर शेतमजूर, कामगार आणि सर्वच लोकांची आहे.  दरवर्षीच्या दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकऱ्याकडे पाहिजे तेवढा पुरेसा पशुधन नाही. शेतकऱ्याच्या बांधावर झाडे नाहीत. मुलगा डिग्री घेऊन बेरोजगार फिरतो आहे. महागाई  चरम सिमा गाठलेली आहे. शेतकऱ्याला अडचण आली तर तो कधी आपल्याकडे असलेल्या पशुधनातून तर  कधी शेळी तर कधी म्हैस विकून तो आपला उदरनिर्वाह करायचा. कधी कधी तो आपल्या बांधावरील झाडे सुद्धा विकायचा आणि आपली अडचण भागवायचा. मात्र आज रोजी शेतकरी अशा संकटात सापडला आहे की, त्याच्याकडे पशुधन नाही . आणि शेताच्या बांधावर झाड नाही. मुलगा बेरोजगार फिरतो आहे. आणि शासनाकडून कुठलीही मदत वेळेवर मिळत नाही. अशा भयान परिस्थितीमध्ये सापडल्यामुळे तो  एकतर विषाचा डब्बा जवळ करतो, नाहीतर आपल्या शेतातल्या झाडालाच फाशी घेतो. ही विदारक गंभीर परिस्थिती शासनाला माहित नाही अशातला भाग नाही. शासनाला हे सगळं माहित आहे. परंतु शासन त्याच्यावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. आणि 288 आमदारही याबाबत आवाज उठवत नाही.त्यांना मंत्रीपदाची घाई झालेली आहे. ही अत्यंत शोकांतिका आहे. आज महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला महागाईने हैराण  करून सोडलेलं आहे. आणि शेतकऱ्याला अतिवृष्टी, ओला दुष्काळ, कृषी उत्पन्नाला  योग्य भाव नाही अशा गंभीर समस्यामध्ये शेतकरी अडकलेला आहे. दरवर्षी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे तो  लग्नाला आलेल्या आपल्या मुलीचे सुद्धा  लग्न वेळेवर करू शकत नाही. ही भयानक परिस्थिती लिहिताना मात्र अंगावर काटे येतात. रोज सकाळी पेपर उघडला की, कोणीतरी शेतकरी आत्महत्या केल्याची बातमी वाचायला मिळते. आणि माणुस सुन्न होतो. या अगोदरही अतिवृष्टी झाली, ओला दुष्काळ झाला. परंतु सरकार खंबीर होतं. त्यामुळे त्यावेळी आत्महत्या झाल्या नाही. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांपासून शेतकऱ्याचे आत्महत्याचे सत्र काही थांबत नाही. याला कारण आहे. सरकारचे शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले उदासी धोरण? बाजूच्या तेलंगाना राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पेरणीला पैसा, वीज मोफत, खत बी बियाणे सबसिडीवर मिळतात.शिक्षण आरोग्य विषयक मूलभूत सुविधा मोफत उपलब्ध  आणि आपल्या महाराष्ट्रात असं का नाही? त्याच  नेमकं कारण म्हणजे महाराष्ट्राचे सरकार हे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये गोंधळलेले आहे. गेल्या साठ वर्षांमध्ये अशी गंभीर परिस्थिती सरकारची झालेली नव्हती. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये  माणूस आडवा आणि माणूस जिरवा अशी परिस्थिती मात्र महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. ती आज आपल्याला पाहायला मिळते. इडीच्या आणि सीडीच्या जोरावर चांगल्या चांगल्या दमदार नेत्याला  घायाळ करून आपला पक्ष वाढवण्यामध्ये काही प्रमुख नेते मंडळी लागलेली आहे. हे अत्यंत चुकीचे आणि असमर्थनीय  आहे.  कितीही फोडाफोडीचे राजकारण करा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाही. अशीच सर्वत्र चर्चा आज रोजी सगळीकडे ऐकायला मिळत  आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी, कामगार, मजूर यांच्या प्रश्नापेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराचीच सगळ्यांना चिंता लागलेली  की, आम्हाला काही मंत्रीपद मिळायला पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष न देता मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेला आहे. यावरून सामान्य जनतेच्या लोकांचे काय! असा प्रश्न निर्माण होतो. एक वर्षात निवडणुका येणार आहेत. मतदार संघामध्ये आपली पकड निर्माण करायची असेल तर आपला मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हायला पाहिजे अशी आस लावून अनेक आमदार मुंबईच्या चकरा मारत आहे. इकडे मात्र त्यांच्या मतदारसंघात जनता त्यांना शोधत असून आपण मंत्री जर झालो तरच येणाऱ्या निवडणुकीत निवडून येऊ अशी चुकीची कल्पना करून ते गोरगरीब जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून मुंबईच्या चकरा मारत आहेत. परंतु गोंधळलेल्या सरकारमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईलच की, नाही हे आज तरी सांगता येत नाही‌.  परंतु येणाऱ्या एक दोन महिन्यात अपात्रतेमुळे कदाचित सरकारच जाऊ शकते अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आज महाराष्ट्राचे सरकार सर्वच आघाडीवर फेल असल्याची चर्चा होत आहे. त्याचे नेमके कारण आरोग्याची  व शिक्षणाची  व्यवस्था व्हेंटिलेटर आहे. वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नोकरीचा अनुशेष भरण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही‌. एवढेच नव्हे तर पंधरा हजार शाळा बंद करण्याचा डाव सुद्धा सरकारने आखला आहे. मागासवर्गीयाचे आरक्षण आणि पदोन्नतीकडे सरकारचे लक्ष नाही. विविध संघटने कडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवशीय आंदोलन कर्मचाऱ्यांचे नुकतेच पार पडले. परंतु सरकारने त्याकडे कानाडोळा करत कोणताही ठोस निर्णय घ्यायला धजत नाही. त्यामुळे गोंधळलेले सरकार म्हणण्याची पाळी कंटाळलेल्या जनतेवर आलेली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात काय भुललासी वरलिया रंगा! त्यामुळे सरकार अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सरकारला  आता जनता कंटाळलेली आहे एवढे मात्र नक्की खरे?

बघूया 2024 मध्ये घोडा मैदान जवळ आहे. सरकार आपल्या दारी... शेतकरी मात्र बांधावरी!



            लेखक 

पंजाब चव्हाण याडी कार पुसद

Post a Comment

0 Comments