नागपुरमध्ये कमी वयाच्या प्रियकरासाठी पत्नीने पतीला संपवल्याची घटना घडली आहे. शेखर बबलू कनोजिया असं मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
नागपूर: अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला सत्र न्यायाधीश आर. आर. भोसले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पंकज चंद्रकांत कडू (२७, रा. सोनेगाव) आणि सरिता शेखर कनोजिया (४०,रा. जयताळा) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर शेखर बबलू कनोजिया (४७, रा. जयताळा) यांच्या हत्येचा आरोप होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सरिता आणि शेखर यांचे लग्न झाले होते. त्यांना अपत्यही होते. मात्र, सरिता पंकजच्या संपर्कात आली. या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. ही बाब शेखरच्या लक्षात आली. या दोघांच्या अनैतिक संबंधांवर त्याने आक्षेप घेतला. यावरून पती, पत्नींमध्ये वाद सुरू झाले. सरिताला शेखरचा काटा काढायचा होता. तिने पंकजच्या सहाय्याने त्याच्या हत्येचा कट रचला. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री नऊच्या सुमारास या दोघांनी त्याचे अपहरण केले. दगडाने त्याचे डोके ठेचले. यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.
तपासाअंती त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील लिलाधर शेंद्रे यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपांना दोषी ठरवित त्यांना जन्मठेपेची व प्रत्येकी ८५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, शेजारी राहणाऱ्या लोकांना शेखरच्या घरातून सतत ‘मला मारू नका, मी मरेन’ असे मोठ-मोठ्याने आवाज येत होते. ६ ते ८ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस आरोपी सरिता आणि तिचा प्रियकर पंकज यांनी शेखरला सतत तीन दिवस अमानुष मारहाण केल्याने शेखर यांचा मृत्यू झाला होता.
0 Comments