Bhiwandi News : भिवंडीमध्ये पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे.
सुनील घरत, प्रतिनिधी
भिवंडी, 29 जुलै : माती खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने या पाणी साचलेल्या डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी भिवंडी शहरातील पोगाव डोंगरपाडा परिसरात घडली आहे. अली अन्वर शेख (वय 17 वर्ष) व सानीब रईस अन्सारी (वय 16 वर्ष) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत.
गेल्या दोनचार दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला होता. परिणामी नदी नाल्यांना पूर आला आहे. भिवंडी येथील मातीसाठी खणलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. अली व सानीब हे दोघेही शांतीनगर परिसरात राहणारे होते. पोगाव डोंगरपाडा येथे खड्ड्यांमध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये अंघोळीसाठी मित्रां सोबत गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना इतर मित्रांनी शेजारील नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर युवक राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. या ठिकाणी मागील चार वर्षात अशा पाण्यात बुडून मुलांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासन आणखी किती मुलांचा जीव घेणार? असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.
0 Comments