धावत्या बाईकवर रोमान्स करणं जोडप्याला पडलं महागात; Video व्हायरल होताच पोलिसांनी मोठा दंड ठोठावला.
सोशल मीडियावर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नको ते स्टंट करणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे स्टंट अनेकदा सामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरतात. याबाबतची अनेक उदाहरणं आपण याआधीही पाहिली आहेत. अशातच आता एका जोडप्याचा व्हिडीओ समोर आहे, ज्यामध्ये ते भरधाव बाईकवर रोमान्स करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून भररस्त्यात बाईकवर रोमान्स करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच उत्तर प्रदेशातील हापूर येथील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जोडपे धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे, तर त्याच्यासमोर त्याची प्रेयसी बसली आहे. यावेळी प्रेयसीने त्या तरुणाला घट्ट मिठी मारल्याचं पाहायला मिळत आहे. तर हेल्मेट न घातल्याने या जोडप्याने रस्ता सुरक्षा नियमांचेही उल्लंघन केल्याचा आरोप अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. तसेच जोडप्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही अनेकांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सिंभावली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ९ वर घडली असून या जोडप्याच्या बेजबाबदार कृत्यावर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच हापूर पोलिसांनी या जोडप्याला मोठा दंड ठोठावला आहे. दुचाकी चालकाला मोटार वाहन कायद्यानुसार आठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी ट्विटद्वारे दिली आहे.
0 Comments