टोलमाफीच्या वक्तव्यावरुन राज ठाकरे सापडणार गोत्यात?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल केवळ व्यावसायिक वाहनांकडून टोल घण्यात येतो, प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल (Toll) नाही, असं वक्तव्य केलं. मात्र याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोध केला. शिवाय या वाहनांकडून टोल घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज मनसैनिकांनी राज्यातील अनेक टोलनाक्यांवर जात आक्रमक भूमिका घेतली होती. मुलुंड येथे तर टोलनाका जाळण्यात आला. राज ठाकरेंमुळे होणार्या या नुकसानामुळे त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पक्ष (Republican Party) खरात गटाचे प्रमुख सचिन खरात (Sachin Kharat) यांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी ही मागणी आहे. सचिन खरात यांनी म्हटले की, टोलच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी तोडफोडीची भाषा वापरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर राज्य आणि देश चालतो. त्यामुळे राज ठाकरेंची तोडफोडीची भाषा ही असंवैधानिक आहे. राज ठाकरेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही करत आहोत, असे त्यांनी म्हटले.
0 Comments