अति जलदगतीने या रेल्वे मार्गावरून वेगवान मालगाड्या धावणार आहेत. त्यामुळे हे मार्ग ओलांडताना प्रवाशांना जीव धोक्यात घालावे लागणार आहे.
डोंबिवली : दिवा-वसई रेल्वे मार्गावर आयरे, रेतीबंदर-मोठागाव, देवीचापाडा भागात रेल्वे मार्गा पलीकडे राहत असलेल्या रहिवाशांना येण्याजाण्यासाठी पादचारी पूल नाही. त्यामुळे या भागातील रहिवासी रेल्वे मार्गातून येजा करतात. रात्रीच्या वेळी या भागात अनेक वेळा अपघात घडले आहेत.
दिवा-वसई रेल्वे मार्गावर डोंबिवलीतील आयरे, रेतीबंदर, देवीचापाडा, कोपर, म्हात्रेनगर परिसर आहे. या रेल्वे मार्गाच्या पलीकडे नागरी वस्ती आहे. मोठागाव रेतीबंदर भागात फक्त रेल्वेचे फाटक आहे. अन्य ठिकाणी रेल्वेचे फाटक नाही. आयरे गाव हद्दीत रेल्वे रुळखाली भुयारी मार्ग आहे. हा मार्ग जुनाट झाला आहे. या मार्गातून, रेल्वे फाटकातून जाणे वळसा घेऊन आणि वेळखाऊ असल्याने अनेक रहिवासी रेल्वे मार्गातून प्रवास करतात. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश असतो.
डोंबिवलीतून पनवेल-वसई रेल्वे मार्गालगत नवी दिल्ली-जेएनपीटी (उरण) समर्पित जलदगती रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. अति जलदगतीने या रेल्वे मार्गावरून वेगवान मालगाड्या धावणार आहेत. त्यामुळे हे मार्ग ओलांडताना प्रवाशांना जीव धोक्यात घालावे लागणार आहे. हा मालवाहू रेल्वे मार्ग सुरू होण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने आयरे, देवीचापाडा भागात परिसरातील नागरिकांचा विचार करून पादचारी जिने उभारण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
0 Comments