-->

Ads

चार वर्षांच्या लेकीचा चौथ्या मजल्यावरुन पडून करुण अंत,आई वडिलांनी दु:खातही लेकीच्या नेत्रदानाचा निर्णय

Palghar News : पालघरमधील विरार येथील एका १९ मजली इमारतीमधील चौथ्या मजल्यावरुन पडून एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. यामुळं तिच्या आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, त्यांनी लेकीचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.


पालघर: इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विरार परिसरात घडली आहे. दर्शनी सुरेश शालियान असे या घटनेत मृत्यू झालेल्या चार वर्षाच्या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, अपल्या मुलीचे डोळे दान करत तिच्या आई-वडिलांनी धाडसी निर्णय घेतला.

विरार पश्चिमेकडे बच्चराज ही १९ मजल्यांची हाय प्रोफाईल इमारत असून या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शालियान कुटुंब भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहेत. सुरेश शालियान हे मुंबईला कामाला जातात. त्यांची पत्नी आणि दर्शनी शालियान हिची आई त्यांना रेल्वे स्टेशनला सोडायला गेली होती. यादरम्यान दर्शनीला तिच्या आईनं घरात झोपवलं होतं. घरात झोपलेल्या दर्शनीला याच दरम्यान जाग आल्याने तिने आपल्या आईला रूममध्ये पाहिले. मात्र, आपली आई दिसत नसल्याने तिने बेडरूममधील बेडवर उभे राहून खिडकीतून इमारतीच्या खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. खाली वाकून पाहताना या चिमुकल्या दर्शनीचा तोल गेला आणि चिमुकली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडली. यात चार वर्षाच्या चिमुकली दर्शनी हिचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबातील चिमुकलीचा असा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्या मुलीचा असा अचानक अपघाती मृत्यू झाला आणि इतका मोठा दुःखाचा डोंगर आपल्यावर असताना देखील शालियन दाम्पत्यानं एक धाडसी निर्णय घेतला. आपली मुलगी या जगात नसली तरीही तिच्या डोळ्यांमुळे कोणालातरी दृष्टी मिळेल आणि हे जग पाहता येईल या भावनेतून चार वर्षाच्या मृत चिमुकली दर्शनीचे डोळे तिच्या आई- वडिलांनी दान केले आहेत. मृत चिमुकली दर्शनीच्या आई-वडिलांनी तिचे डोळे दान करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.


Post a Comment

0 Comments