-->

Ads

ठाणे: मेट्रो १२ मार्गिकेच्या उभारणीला गती

ठाणे भिवंडी कल्याण या महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे विस्तारित स्वरूप असलेल्या कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या उभारणीला गती प्राप्त झाली आहे.

ठाणे: ठाणे भिवंडी या कल्याण महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे विस्तारित स्वरूप असलेल्या कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या उभारणीला गती प्राप्त झाली आहे. या प्रकल्पाच्या स्थापत्य,विद्युत यासह इतर कामाच्या संकल्पचित्र सल्लागाराच्या नेमणुकीच्या निर्णयावर नुकत्याच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात होण्याची आशा आहे. या मेट्रो मार्गामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण ही शहरे थेट नवी मुंबईला जोडली जातील आणि समांतर मार्ग प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २७६ व्या कार्यकारी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मुंबई महानगर परिसरातील विविध प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेशात होणारी लोकसंख्या वाढ, विकास आणि रोजगारवाढ लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आवश्यक असणारे परिवहन जाळे उभारण्याचा निर्णय यापूर्वीच २००८ वर्षात प्रकाशित सर्वकष परिवहन अभ्यासात घेतला होता. कल्याण-डोंबिवली या शहरातील वाढती लोकसंख्या तसेच परिसराचा होणारा विकास, विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या २७ गावांचा विकास आराखडा, कल्याण विकासकेंद्र व नैनाचे क्षेत्र तसेच कल्याण आणि डोंबिवली ही शहरे नवी मुंबई या शहराला जोडण्याची गरज होती. याबाबत स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आग्रही पद्धतीने कल्याण नवी मुंबई शहरे मेट्रोने जोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो मार्ग-५ अर्थात ठाणे-भिवंडी-कल्याण या मार्गाला पुढे डोंबिवलीमार्गे कल्याण ते तळोजापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मेट्रो मार्गिका १२चा विस्तार प्रस्तावित केला गेला. सर्व प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर आता या मार्गातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मेट्रो मार्ग १२ करीता सविस्तर संकल्पचित्र सल्लागार नेमणूकीसाठी निविदा मागविल्या होत्या. संबंधित कंपनीकडून स्थानकांच्या इमारतीच्या वास्तुकला योजना त्यात विद्युत यांत्रिकी सेवांचे संकल्पचित्र बनवणे, डेपोमधील इमारतीचे विस्तृत संकल्पचित्र बनवणे अपेक्षित होते. प्राप्त निविदांमधून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मे. एल के टी इंजिनिअरींग कन्सलटंट लिमिटेड आणि एनिया डिझाईन प्राइव्हेट लिमिटेड यांचे संयुक्त उपक्रम यांची सविस्तर संकल्पचित्र सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता या मेट्रो मार्गाच्या उभरणीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मार्गी लागला आहे.

या मार्गाची एकूण लांबी २०.७५६ किलोमीटर असून या मार्गात एकूण १७ स्थानके प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता या प्रकल्पाला “महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मार्गामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली हा भाग थेट नवी मुंबईशी जोडला जाणार आहे.


Post a Comment

0 Comments