-->

Ads

बहिणीच्या भेटीला मित्रांसह ट्रिपल सीट निघाला, वाटेत बसची जोरदार धडक, एकाचा जागेवरच मृत्यू

बहिणीच्या भेटीला मित्रांसह ट्रिपल सीट निघाला, वाटेत बसची जोरदार धडक, एकाचा जागेवरच मृत्यू


जालना: जालना जिल्ह्यातील अंबड येथून भोकरदन येथे राहत असलेल्या बहिणीच्या भेटीला दुचाकी वरून जाणाऱ्या तीन मित्रांचा बसच्या जोरदार धडकेत अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. काल रविवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भोकरदन - जालना महामार्गावरील केदारखेडा गावजवळील जवखेडा फाट्यावर हा अपघात झाला. त्यात अंबड येथील २२ वर्षीय अबुजर जिकरिया शाह याचा जागेवरच मृत्यू झाला असून अंबड येथीलच २० वर्षीय अजहर अली शहा व अरबाज महम्मद पठाण हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड येथील अरबाज महम्मद पठाण हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी भोकरदन येथे निघाला होता. जिगरी दोस्त असल्याने त्याने अबुजर शाह,अजहर अली शहा या दोघांना मित्रांनाही सोबत घेतले आणि एकच दुचाकीवर भोकरदन येथे बहिणीच्या भेटीला निघाले होते. भोकरदन-जालना महामार्गावरील केदारखेडाजवळील जवखेडा फाट्यावर भोकरदनहुन जालण्याकडे जाणाऱ्या सिल्लोड-अंबड बस क्रमांक एम.एच.०६ एस. ८५४६ ला या तिघांच्या दुचाकी क्रमांक एम.एच.१३ डि.ए. ४३०६ ने समोरासमोर जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या धडकेत अबुजर शाह हा जागेवरच ठार झाला. अपघात होताच यावेळी उपस्थित नागरिकांनी अजहर अली शहा व अरबाज महम्मद पठाण या दोघांना उचलुन भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. येथे दोघांवर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे.

अंबड आगाराची सिल्लोड अंबड बस क्र. एम.एच. ०६- एस. ८५४६ ही सिल्लोडहून अंबडकडे जात होती. ही बस रविवारी संध्याकाळी केदारखेडा जवळ आली असता समोरून येणाऱ्या दुचाकी एम.एच. १३- डी.ए.४३०६ जोराची धडक दिली. समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात दुचाकी बसखाली गेल्याने तिचा चुराडा झाला व त्यातच दुचाकीवरील अबुजर जिकरीया शहाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी १०८ व ११२ क्रमांकावर फोन करून जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्याचा प्रयत्न केला.परंतु, समोरून प्रतिसाद मिळाला नाही.घटनास्थळी ताबडतोब पोहचलेल्या पोलिसांनीच आसपासच्या नागरिकांच्या मदतीने जखमींना बसखालून ओढून काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत जवळपास एक तासाचा वेळ गेला होता.

दरम्यान, दुचाकीवरील तरुणांनी दुचाकी अचानक वळवली. त्यांना वाचविण्यासाठी चालकाने बस रस्त्याच्या खाली घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर बस चालक आर. एस. राठोड यांनी स्वतः भोकरदन ठाण्यात हजर होऊन अपघाताबाबत माहिती दिली.भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा पूर्ण केला.

बहिणीच्या भेटीसाठी मित्रांना सोबत घेऊन जाणाऱ्या भावाला मात्र बहिणीच्या भेटी आधी मित्राचा मृत्यू पहावा लागल्याने उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.तर भरघाव वेगाने दुचाकी चालवत अशा चुकीच्या पद्धतीने प्रवास करून स्वतःचा व रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या या घटनेबद्दल देखील उपस्थितांनी संताप व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments