-->

Ads

अंगणात आजोबांसोबत खेळत असताना बिबट्याचा हल्ला, चार वर्षांच्या शिवांशचा दुर्दैवी मृत्यू

Pune Leopard Attack On Child: अंगणात आजोबांसोबत खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तो चिमुकला गंभीर जखमी झाला आणि मग उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


जुन्नर: आळे गावातील तितर मळ्यातील अमोल भुजबळ यांच्या घरातील अंगणात खेळत असलेल्या शिवांश भुजबळ या चार वर्षाच्या बालकावर ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवांशचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ही दुर्घटना सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेमुळे आळे ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाल्याने बिबट्यांच्या या परिसरात सातत्याने होणाऱ्या उपद्रवाची दखल घेऊन पिंजरे लावून त्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास आळेफाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्ना डोके यांनी दिला आहे.

अधिक माहिती अशी की, शिवांश हा त्याच्या आजोबांसोबत घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी घरासमोरील ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून शिवांशची मान पकडून त्याला नेऊ लागला. लागलीच परिसरात आरडोओरडा झाला. त्यावेळी या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने मोठ्या हिमतीने बिबट्याच्या मागे पळत जाऊन शिवांशला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शिवांशला घरच्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारा दरम्यान शिवांशचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच ओतुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. एम. काकडे, आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी घटनास्थळी भेट दिली.

९ महिन्यात पाचवा बळी

वनविभागाकडे उपलब्ध असलेल्या नोंदींनुसार जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात गेल्या ९ महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या या घटनेने पाच झाली आहे. जानेवारी ते एप्रिल या सलग चार महिन्यात चार बळी गेले. तर शिवांशच्या रुपात पाचवा बळी गेला असून एकूण १० जण आतापर्यंत जखमी झाले आहेत.

दुचाकीस्वारावर हल्ला


चारच दिवसांपूर्वी आळेफाटा परिसरात आगरमळा येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता यामध्ये थोडक्यात तो वाचला आहे.

गस्तीपथकांची नियुक्ती

झालेली घटना दुर्देवी आहे.याबाबतीत सर्व काही मदत कुटुंबियांना केली जाईल.पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आडवस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांनी शक्यतो सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडताना खबदरारी घ्यावी - अमोल सातपुते(उपवनसंरक्षक,जुन्नर वनविभाग)


Post a Comment

0 Comments