सुजाता साहू असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. जूनमध्ये ही महिला मजूर इमारतीच्या १५ व्या माळ्यावरून पडून मरण पावली होती.
कल्याण – कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयाजवळील एका विकासकाच्या गृहप्रकल्पात एक महिला मजूर म्हणून काम करत होती. जूनमध्ये ही मजूर महिला निर्माणाधिन इमारतीच्या १५ व्या माळ्यावरील परांचीवरून पाय घसरून चौथ्या माळ्यावरील स्लॅबवर पडली. तिच्या सर्वांगाला गंभीर दुखापती होऊन तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून महात्मा फुले पोलीस चौक पोलिसांनी तपास करून याप्रकरणी बुधवारी या इमारतीचा विकासक, ठेकेदार, भागीदार यांच्यावर गुन्हे दाखल केले.
ओम शिव डेव्हलपर्सचे विकासक मालक प्रमोद तिवारी, योगेश दातीलकर, ठेकेदार योग एन्टरप्रायझेसचे मालक रुपेश पाटील, मजूर पुरवठादार ठेकेदार यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आशीष भगत यांनी गुन्हा दाखल केला आहे. सुजाता साहू असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. जूनमध्ये ही महिला मजूर इमारतीच्या १५ व्या माळ्यावरून पडून मरण पावली होती.
पोलिसांनी सांगितले, सुजाता साहू ही महिला आरोपींच्या गृहप्रकल्पावर मजूर म्हणून काम करत होती. इमारतीच्या १५ व्या माळ्यावर बांधकामासाठी बांधलेल्या परांचीवर उभी राहून ती एका गवंड्याला वीट रचई कामाची ओळंब्याच्या साहाय्याने एक ओळीतील कामाची माहिती देत होती. यावेळी परांचीवरील तिचा पाय सटकून ती १५ व्या माळ्यावरून चौथ्या माळ्यावरील स्लॅबवर पडली. तिच्या सर्वांगाला गंभीर जखमा झाल्या होत्या. तिची पायाची हाडे मोडली होती. तिला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी या निर्माणाधिन इमारतीच्या चारही बाजूने कामगार सुरक्षेसाठी संरक्षित जाळी बांधली नव्हती. मजुरांना शिरस्त्राण, हात, पायमोजे देण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. या महिलेच्या मृत्यूला या बांधकामाशी संबंधित मालक, भागीदार, ठेकेदार कारणीभूत आहेत असा निष्कर्ष काढत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
0 Comments