Thane Dombiwali Road : डोंबिवलीतील अरुंद रस्त्यांवर वाहतूककोंडी होण्याची भीती असल्याने ही कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने पर्यायी रस्त्यांसाठी नियोजन केले आहे.
कल्याण : ठाणे ते डोंबिवली अंतर कमी करण्यासाठी डोंबिवली पश्चिमेकडील उल्हास नदीवर मोठागाव ते मानकोली उड्डाणपूल एमएमआरडीएच्या निधीतून उभारण्यात आला आहे. या पुलाच्या जोडरस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलामुळे डोंबिवलीपल्याड जाणाऱ्या वाहन चालकांच्या वेळेत बचत होणार आहे, मात्र हजारो वाहन चालकांकडून या पुलाचा वापर केला जाणार असल्याने डोंबिवली पश्चिमेकडील अरुंद रस्त्यांवर वाहतूककोंडी होण्याची भीती आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पालिका प्रशासनाने पर्यायी रस्ते तयार करण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार जुनी डोंबिवली आणि कोपर बोगद्यातून रस्ते प्रस्तावित करत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मानकोली पुलावरून डोंबिवलीकडे येणाऱ्या वाहनचालकांना सध्या तरी मोठागाव येथील दिवा वसई रेल्वे रूळ ओलांडून शहरातून मार्गक्रमण करावे लागणार आहे, मात्र रेल्वे फाटक उघडण्याची प्रतीक्षा करत थांबणाऱ्या वाहनांमुळे लांबच लांब रांगा लागत असताना पुलांवरील वाहतूक सुरू झाल्यास ही कोंडी वाढणार आहे. त्यातच पालिकेचे रस्ते अतिशय अरुंद असल्याने वाहनचालक मेटाकुटीला येण्याची आणि शहरातील कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.
यामुळे प्रशासनाकडून रिंगरोड ३ च्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करतानाच एमएमआरडीएला काम सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. रिंगरोडचे तसेच दिवा वसई मार्गावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत मानकोली पुलाकडून जुन्या डोंबिवलीकडील बाजूस आणि त्यापुढील जागेतून कोपर बोगद्याकडे जाणारे दोन रस्ते प्रशासनाने प्रस्तावित केले असून पुलावरून येणारी वाहतूक मोठागावबरोबरच जुनी डोंबिवली आणि कोपरकडे जाणाऱ्या अशा तीन मार्गांनी ही वाहतूक वळविल्यास वाहतुकीचे नियोजन करणे सोयीचे होऊ शकेल, असा प्रशासनाचा कयास आहे. आधीच अरुंद असणाऱ्या डोंबिवली पश्चिमेकडील रस्त्यावर पडणारा वाहतुकीचा ताण आणि त्यामुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी रिंगरोडसारखा दूसरा सक्षम पर्याय नसल्याने रिंगरोडचे काम वेगाने पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे.
0 Comments