-->

Ads

स्कूटीवरुन तोल गेला अन् गर्भवती महिला पुलावरुन कोसळली; ४ वर्षांचा मुलगा रात्रभर मृतदेहाजवळ बसून

मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी निघालेली एक गर्भवती महिला स्कुटीसह वर्धा नदीच्या पुलावरून खाली कोसळली.


चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून भयानक घटना घडली. मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी निघालेली एक गर्भवती महिला स्कुटीसह वर्धा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली. रात्रीची वेळ असल्याने कुणाच्याही ही घटना निर्दशनात आली नाही. त्यामुळे उपचाराअभावी या महिलेचा मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेत ४ वर्षीय चिमुकला बचावला. 

पण तो रात्रभर आईच्या मृतदेहाला मिठी मारून रडत होता. दरम्यान, रात्री उशीर होऊन सुद्धा पत्नी घरी न आल्याने पतीने तिला वारंवार फोन केले. मात्र, फोनवरुन काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. चिंता अधिकच वाढल्याने पतीने तातडीने  पोलिसात (Police) धाव घेतली. अखेर पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरुन महिलेचं लोकेशन तपासलं. तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

सुषमा पवन कुमार काकडे (२९, बामणी, बल्लारपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. गर्भवती महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आदित्य प्लाझा (Chandrapur News) येथे पवन काकडे हे कुटुंबासह राहतात. ते बल्लारपुरातील एका बँकेत नोकरीला आहेत. बुधवारी सायंकाळी ते घरी गेले असता त्यांच्या ४ वर्षीय मुलाने चॉकलेट घेऊन देण्याचा आग्रह धरला.

त्यानंतर आई सुषमा या मुलाला चॉकलेट घेऊन देण्याकरिता सायंकाळी स्कुटीने घराबाहेर पडल्या. मात्र, बामनीहून राजूराला जाताना वाटेतच वर्धा नदी पूलावर सुषमाचं स्कूटीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ४ वर्षाचा मुलगा आणि सुषमा स्कूटीसह पुलावरून खाली कोसळले. यात सुषमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला.

अंधार असल्याने कुणाचीही या दोघांवर नजर पडली नाही. आईच्या मृतदेहाजवळ चिमुकला रात्रभर रडत होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी परत आले नाहीत. पती पवन कुमार काकडे यांनी पत्नी व मुलाबाबत नातेवाइकांकडे चौकशी केली. पण, त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली.


Post a Comment

0 Comments