-->

Ads

कुटुंबात विष कालवलं! एकाच घरातील ५ जणांच्या मृत्यूचं गूढ उकललं, सूनेचं काळं कृत्य आलं समोर

गडचिरोतील मृत्यूसत्राचे गूढ उकलण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे.

गेल्या काही दिवसापांसून गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील महागाव येथील एकाच कुटुंबातील ५ जणांच्या अचानक झालेल्या मृत्यूची राज्यभरात चर्चा सुरू आहे. गडचिरोलीतील शंकर पिरु कुंभारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचा अवघ्या 20 दिवसाच्या कालावधीत अचानक आजारी पडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या मृत्यूसत्राचे गूढ उकलण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे.

20 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे दोघांना अहेरी, चंद्रपूर त्यानंतर नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु 26 सप्टेंबरला शंकर कुंभारे तर २७ सप्टेंबरला त्यांच्या पत्नी विजया यांचा मृत्यू झाला.

या धक्क्यातून सावरत असताना अचानक त्यांची अहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर आणि मुलगा रोशन कुंभारे यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर शंकर कुंभारे यांची मेहुणी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडली. या सर्वांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. अनेक औषध उपचार करुनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली.

8 ऑक्टोबर रोजी कोमल दहागावकर, 14 ऑक्टोबरला आनंदा ऊर्फ वर्षा उराडे तर 15 ऑक्टोबरला रोशन कुंभारे याचाही मृत्यू झाला. आई-वडील उपचारासाठी रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा दिल्ली येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला होता. मात्र, आई वडिलांच्या मृत्युनंतर तो दिल्लीला परत गेला. त्यानंतर अचानक त्याचीही प्रकृती बिघडली. त्याला दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं.

शंकर कुंभारे आणि विजया कुंभारे यांना अहेरी येथून चंद्रपूर येथे उपचारासाठी नेणारा त्याच्या कारचा चालक राकेश मडावी याची देखील दुसऱ्या दिवशी प्रकृती बिघडली. त्याला देखील चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं.

तसेच नातलग भरती असल्याने त्यांना मदतीच्या उद्देशाने शंकर कुंभारे यांच्या मेहुणीचा मुलगा चंद्रपूर आणि नागपूर येथे आल्याने त्याची देखील प्रकृती बिघडली. त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या तीनही व्यक्तींची प्रकृती स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.


पाच जणांना नेमकं काय झालं?

मृत्यू पावलेल्या ५ व्यक्ती आणि सध्या उपचार घेत असलेल्या तीन व्यक्तींमध्ये हाता-पायाला मुंग्या येणे, कंबरेखालील भागामध्ये आणि डोक्यामध्ये प्रचंड वेदना येणे, ओठ काळे पडून जीभ जड पडणे यासारखे एकसमान लक्षणे दिसून आली. या लक्षणावरुन मृत आणि आजारी व्यक्तींना कोणत्यातरी प्रकारची विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तवला. परंतु त्यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये विषाबाबत अधिक निश्चित माहिती निष्पन्न झाली नाही.

एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींच्या अल्पावधित झालेल्या गूढ मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरुन भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी तात्काळ वेगवेगळे चार तपास पथक गठीत केले. विविध जिल्ह्यात आणि तेलंगणा राज्यात तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरु केले.

पाच जणांना का संपवलं?

गोपनीय सुत्रांकडून गावात शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे आणि मेहुण्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्या दोघींच्या हालचालींवर पोलीसांनी बारकाईने लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली.

महिला आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याच्यासोबत तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले. या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. यानंतर पती रोशन आणि सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांना वारंवार टोमणे मारायचे.

तसेच सहआरोपी रोझा रामटेके हिने तिच्या सासऱ्यांच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे आणि तिच्या इतर बहिणी हिस्सा मागून नेहमी वाद करीत असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे कुटुंब आणि त्यांच्या नातलागांना विष देऊन जीवे ठार मारण्याची योजना आखली.

रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जाऊन विष आणले. रोझाने ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये मिसळून त्यांना खाण्यास दिले. या विषाचा हळूहळू परिणाम होऊन त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरुवात झाली. या घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यू झाला.

कार चालक हा शंकर कुंभारे हा त्यांच्या कुटुंबातील नव्हता. परंतु तो त्यांच्या गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी प्यायल्याने विषबाधा होऊन तो आजारी पडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



Post a Comment

0 Comments