-->

Ads

Jalna Maratha Andolan: जालन्यातील मराठा आंदोलन नेमकं का चिघळलं? पोलिसांच्या कृतीचा VIDEO होतोय व्हायरल

Jalna Maratha Andolan Latest News: एका पोलीस अधिकाऱ्याने घोषणा देणाऱ्या एका आंदोलकाची कॉलर पकडली आणि त्याला खाली खेचल्याचं व्हिडीओत दिसत आहे. 


Jalna Maratha Andolan Latest News: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी जाळपोळ तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर आम्ही लाठीचार्ज केला असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दुसरीकडे गावकऱ्यांनी मात्र या गोष्टीचे खंडण केले असून पोलिसांनी (Police) आंदोलनस्थळी येऊन दमदाटी करत काही तरुणांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं असा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आंदोलनस्थळावर नेमकं काय घडलं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत अंबड तालुक्यातल्या (Jalna News) सराटी अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करताना दिसून येत आहे. यावेळी काही पोलीस आंदोलनास्थळी पोहचले. त्यांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची विनंती केली.

दरम्यान, पोलीस आंदोलनस्थळी पोहचताच काही आंदोलकांनी 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने घोषणा देणाऱ्या एका आंदोलकाची कॉलर पकडली आणि त्याला खाली खेचल्याचं व्हिडीओत दिसत आहे.


पोलिसांच्या या कृत्याने आंदोलक संतापले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे आंदोलनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

मात्र काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्याचं व्हिडीओत दिसतंय. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीमारात महिला आंदोलकांसह अनेक आंदोलक जखमी झाले. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत.

अनेक ठिकाणी मराठा युवक रस्त्यावर उतरला असून राज्य सरकारचा निषेध करत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाठीचार्जच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Post a Comment

0 Comments