-->

Ads

रांगत चुलीत गेला, पण मृत्यूच्या दाढेतून परतला, साताऱ्याचा सचिन आता करतो मृतदेहांवर अंत्यसंस्कार

Satara News: साताऱ्यातील माहुली येथील कैलास स्मशानभूमीत काम करणाऱ्या सचिन सोनावणेची ही कहानी आहे. सचिन चक्क मृत्यूच्या दाढेतून परत आलेला आहे. त्यानंतर, सचिन करतोय मृतांवर अंत्यसंस्कार...


सातारा : जन्म आणि मृत्यू हा सगळ्यांच्याच वाट्याला आलेला आहे. यातून कोणाचीही सुटका नाही. तो मग गरीब असो किंवा श्रीमंत. साताऱ्यात असाही एक व्यक्ती आहे की तो मृत्यूच्या दाढेतून परत आलाय.

स्मशानभूमी म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतोच पण साताऱ्यातील हा सचिन सोनावणे मात्र मृत्यूला घाबरत नाही. अपंगत्व आलेला सचिन साताऱ्यातील माहुली येथील कैलास स्मशानभूमीत देखरेखीच काम करतो. आजपर्यंत त्याने हजारो मृतांवर अंत्यसंस्कार केलेत. मग तो श्रीमंत असो की गरीब. समाजसेवा म्हणून स्वीकारलेले हे काम त्याला आज दोन वेळची रोजीरोटी मिळवून देतेय.

सचिनकडे पाहून कोणीही म्हणल की हा काय काम करतोय. पण त्याची एका हाताची चालाकी पाहिली तर तुम्ही अचंबित व्हाल. संपूर्ण कैलास स्मशानभूमीत मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी आणल्यानंतर अगदी सुरुवातीपासून मृतदेह संपूर्ण जळेपर्यंत त्याची पाहणी तो स्वतः करत असतो. हे काम करत असताना त्याला कसलंही भय वाटत नाही. कारण तो रखरखत्या निखाऱ्यांशी दोन हात करत मृत्यूची झुंज देत पुन्हा आलाय. सचिन हा व्यसनमुक्तीवरही काम करतो. शिक्षण म्हणावं तर काहीच नाही पण तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाशी माणुसकीचं नातं जोडणारा हा सचिन काही औरच आहे.

सचिन हा आपली आई इंदुबाई यांच्या समवेत साताऱ्यातील ढोर गल्लीत राहतो. आजच्या घडीला त्याच्या आईचं (वय ६५) आहे. सचिन दीड-एक वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आईनेच सचिनसह त्याच्या पाचही बहिणभावंडांचा रोजंदारी करून सांभाळ केला. सचिनला आजारपणामुळे शिक्षणही घेता आलं नाही. मुलाचं लग्न व्हावं असं आईला सारखं वाटतं. सचिनची आई मुलीच्या शोधात आहे. पण त्याला सांभाळणारी मुलगी तरी भेटायला हवी, असं आईचं म्हणणं आहे. माझ्यानंतर त्याला हक्काचं माणूस सांभाळणारा हवा, असं त्याची आई सांगते.

सचिनची गेल्या १५ ते २० वर्षाची सेवा पाहता त्याला अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे. त्याची परिस्थिती पाहून काही लोकांनी त्याला मदतही केल्याचे तो आवर्जून सांगतो. नुकताच त्याला बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन्मानित करून रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आलं होतं. मात्र, त्याने हे बक्षीस कैलास स्मशानभूमीच्या मदतीसाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडे पुन्हा सुपूर्द केले. हा त्याचा मोठेपणा कौतुक करणारा होता. भावंडांमध्ये सचिन हा सर्वात लहान. लहानपणी तसा तो सुदृढ होता. पण त्याच्या घरातच अशी एक विचित्र घटना घडली की त्याला अपंगत्व आलं नव्हे तो मृत्यूच्या दाढेतून परत आला.

त्याचं झालं असं की, आई-वडील कामावर गेल्यानंतर लहान बहिणीकडे त्याला सांभाळण्यासाठी ठेवले होते. पण, सचिन घरात झोपल्याने त्याची छोटी बहीण बाहेर गेली होती. तेवढ्यात तो उठला आणि रांगत रांगत जाऊन चुलीजवळ गेला. चुलीत निखारे असल्याने चुलीला तवा लावून ठेवला होता. त्याने तो काढून थेट चुलीतील निखाऱ्यात हात घातला. त्याचक्षणी त्याचे हात पोळायला सुरुवात झाली. बाल्यावस्थेत असलेल्या सचिनने हातपाय झाडण्यास सुरुवात केली. यावेळी त्याचे हात आणि अंग भाजून निघाले आणि तो मृत झाला. ही वार्ता गल्लीत वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. सर्व तयारी करूनही मृत्यू अवस्थेत पडलेल्या मुलाला अंत्यसंस्काराला नेतेवेळी सचिनची थोडी हालचाल झाल्याचे वडिलांना दिसलं आणि आपला मुलगा जिवंत असल्याची खात्री झाली. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि मुलगा जिवंत असल्याचे कळताच सुरू असलेली धावपळ जागेवरच थांबली.

मग सचिनला पुरण्यासाठी (अंत्यसंस्कारासाठी) काढलेल्या खड्ड्याचं करायचं काय? त्याकाळी मृत्यू झालेल्यासाठी काढलेला खड्डा मोकळा सोडणे, ही लोकांमध्ये अंधश्रद्धायुक्त भीती होती. त्यामुळे या खड्ड्यात जिवंत कोंबडा पुरण्यात आला. त्यानंतर सचिनला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासले तर तो जिवंत असल्याचा सांगितलं. त्यावेळी त्याच्यावर उपचार करण्यात आले.

पण या घटनेत त्याला मात्र, कायमचं अपंगत्व आलं. मात्र त्यावरही त्याने मात करत लहानपणापासूनच छोटी छोटी काम करत आपला उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली. तो कैलास स्मशानभूमीमध्ये कामाला लागण्याअगोदर या याठिकाणी तो जाऊन तेथे येणाऱ्या नातेवाईकांना मदत करत असे. त्याचं हे प्रामाणिक काम पाहून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी त्याला या ठिकाणी देखरेख करण्यासाठी नियुक्त केले. गेली पंधरा वर्षे सचिन हा कैलास स्मशानभूमीमध्ये प्रामाणिकपणे सेवा करत आहे.


Post a Comment

0 Comments