तीन भामट्यांनी गेल्या पाच महिन्याच्या काळात येथील एका औषध विक्रेत्याची ५० लाखाची फसवणूक केली.
पोलिसांनी सांगितले, एप्रिलपासून तिन्ही आरोपींनी औषध विक्रेते गिरीशकुमार यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यांना जी. टेक ट्रेडर्स, अभि एन्टरप्रायझेस या गुंतवणूक कंपन्यांमधील शेअर मधील गुंतवणूक योजनांची माहिती दिली. या शेअर बाजारातील गुंतवणुकीत आपण गुंतवणूक केली तर आपणास दामदुप्पट पैसे अल्पावधीत मिळतील, असे आश्वासन भामट्यांनी व्यास यांना दिले. व्यास यांचा विश्वास संपादन केल्यानंतर भामट्यांनी ऑनलाईन आरटीजीएस, गुगल पे, आयएमपीएस माध्यमातून व्यास यांच्याकडून ५० लाख ५२ हजार गुंतवणुकीसाठी लागणारे विविध कर भार, शेअर मधील ठेव रकमेच्या नावाने वसूल केले.
ही रक्कम तुम्हाला दामदुप्पट पध्दतीने पाहिजे तेव्हा मिळेल. .लाभाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल, असे भामट्यांनी व्यास यांना सांगितले. चार महिने उलटुनही लाभाचा एक पैसा बँक खात्यात जमा झाला नाही. अस्वस्थ झालेल्या व्यास यांनी मूळ रक्कम परत मागण्याचा तगादा भामट्यांकडे लावला. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ते व्यासांच्या संपर्काला प्रतिसाद देईनासे झाले. सतत तगादा लावुनही लाभ नाहीच पण मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली आहे याची खात्री व्यास यांना झाल्याने त्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत.
0 Comments