-->

Ads

खाकीमागची माणुसकी! उज्जैन बलात्कार पीडितेच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी, दोघांनी केलं रक्तदान

मदत मागणाऱ्या अल्पवयीन पीडित मुलीला मध्यरात्री अनेकांनी मदत नाकारली. परंतु, आश्रमातील एका तरुणाने तिला मदत केली. तिला वस्त्र देऊन तिच्या जेवणाची व्यवस्था केली.


मध्य प्रदेशातील उज्जैन बलात्कार प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाने बलात्कार करून तिला अर्धनग्न आणि रंक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर सोडून दिलं. त्यानंतर, ती मदतीसाठी याचना करत असतानाही तिला कोणी मदत केली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेत खाकीतील माणुसकीचंही दर्शन झालं आहे.

मदत मागणाऱ्या अल्पवयीन पीडित मुलीला मध्यरात्री अनेकांनी मदत नाकारली. परंतु, आश्रमातील एका तरुणाने तिला मदत केली. तिला वस्त्र देऊन तिच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर, यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली. दरम्यान दोन पोलिसांनी या मुलीसाठी रक्तदान केलं आहे. तर, एका पोलिसाने पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

उज्जैनमधील महाकाल पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर अजय वर्मा यांनी पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. ते म्हणाले की, मुलीच्या कुटुंबीयांचा शोध लागला नसता तर मी तिला दत्तकच घेणार होतो. तिच्या जखमांवर उपचार सुरू असताना मी तिच्या किंकाळ्या ऐकत होतो, मला रडू कोसळले होते. मला वाटले की देव तिला इतका त्रास का देत आहे.”

पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा शोध लागला आहे. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत न अडकता मी त्यांना मदत करू शकतो. मी तिच्या आर्थिक गरजा, शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेऊ शकतो. जर मला तिचे पालक सापडले नसते तर मी तिला कायदेशीररित्या दत्तक घेतले असते, असंही ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

२५ सप्टेंबर रोजी एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पीडितेच्या आजोबांनी पोलिसांत केली होती. बेपत्ता मुलीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, ती कुठेही सापडली नाही. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास परिसरातील मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर मुलगी बेपत्ता झाली. संबंधित मुलगी मानसिक रुग्ण असून तिला तिच्या गावाचे नावदेखील घेता येत नाही, अशी माहिती पीडितेच्या आजोबांनी तक्रारीत दिली होती.

दरम्यान, संबंधित पीडित मुलगी उज्जैनमधील मंदिरांभोवती फिरते आणि स्थानिक लोकांनी दिलेल्या जेवणावर स्वतःचा उदरनिर्वाह करते. ती आजूबाजूच्या परिसरात फिरत असताना एक माणूस तिच्याजवळ आला. त्याने तिचं तोंड दाबलं. तिचा गळा दाबला. तिचे कपडे फाडले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली.

मुलीवर अत्याचार झाल्यानंतर ती मदतीसाठी इतरस्त्र फिरत होती. परंतु, तिच्या मदतीला कोणीही आले नाही. अर्धनग्न अवस्थेत ती रात्रभर रस्त्यावर फिरत राहिली. अखेर, सकाळी ९.२५ वाजता राहुल शर्मा (२१) या आश्रमसेवकाने पीडितेला पाहिले. या मुलाने तिच्या अंगावर वस्त्र टाकले. तिला जेवण आणि पाणी दिल्यानंतर यासंबंधीत तक्रार त्याने पोलिसांत केली.

 

Post a Comment

0 Comments