-->

Ads

घरात साप चावला, उपचारांसाठी दोन हॉस्पिटल फिरण्याची वेळ, हातातोंडाशी आलेली लेक गेली

Palghar Snake Bite Death : अर्नाळा येथील रहिवासी १७ वर्षांची संजना अशोक चव्हाण आपल्या राहत्या घरात झोपली होती. मात्र ती झोपली असतानाच घरात शिरलेल्या एका सापाने तिच्या हाताला दंश केला


विरार : 
झोपेत असताना विषारी सापाचा दंश झाल्याने एका सतरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईजवळच्या अर्नाळा येथे ही घटना घडली असून संजना अशोक चव्हाण असे या घटनेत मृत मुलीचे नाव आहे.

विरार पश्चिमेकडे असलेल्या अर्नाळा येथील रहिवासी संजना अशोक चव्हाण ही १७ वर्षांची मुलगी आपल्या राहत्या घरात झोपली होती. मात्र ती झोपली असतानाच घरात शिरलेल्या एका सापाने तिच्या हाताला दंश केला. रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

साप चावल्याची बाब तिच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच तिला कुटुंबीयांनी तातडीने बोळींज येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र सर्पदंश झाल्याने त्या ठिकाणी उपचार न मिळाल्याने तिला तातडीने विरार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संजनाच्या तपासणी दरम्यान रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत संजनाचे सोमवारी दहा वाजता शवविच्छेदन करण्यात येईल असे डॉक्टरांकडून तिच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तब्बल तेरा तासानंतर मृत संजनाचे शवविच्छेदन करण्यात आले व तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सतरा वर्षाच्या संजनाचा सर्पदंशाने अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments