माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
श्रावण महिन्यात बंजारा समाजाच्या वतीने 'तीज' हा पारंपरिक व सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जातो दि १ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान कासारबेळ तांड्यावर तिज उत्सव साजरा करुन त्याचे विसर्जन करण्यात आले. यावेळी तांड्याचे नायक उत्तम नाईक, आरून नाईक, रामचंद्र कारभारी, यांच्या निवासस्थानी पूजा करुन, तिज मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संत सेवालाल महाराज मंदिरात तरुणी व महिलांनी पारंपारिक पद्धतीने गाण्यांवर फेर धरला त्यानंतर पेनगंगा नंदीत तिज विसर्जन करण्यात आले.
कासारबेळ येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही बंजारा समाजाच्या वतीने तीज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरिता स्थायिक झालेला, बंजारा समाज एकत्र येऊन आपले सांस्कृतिक वेगळेपण आजही जपत आहे. श्रावण महिना म्हणजे बंजारा समाजातील तरुणींसाठी आनंदाचे हे पर्व, सर्व हेवेदावे विसरून या तरुणी 'तिजोत्सव'ची स्थापना करून आनंद लुटतात. बंजारा समाजाने पूर्वीपासून तीजोत्सव ही पारंपरिक प्रथा जोपासली आहे. यामध्ये पहिल्या दिवशी तरुणी रानावनात जाऊन तेथील वारुळाची माती आणून टोपलीत टाकतात.
त्यानंतर त्यामध्ये गहू टाकत जवाराची स्थापना करतात. सकाळी आणि संध्याकाळी पारंपरिक बंजारा लोकगीत गात या तरुणी घरोघरी जाऊन त्या टोपल्यात पाणी टाकतात. न चुकता सलग नऊ दिवस ही प्रक्रिया चालते. या दिवसात गहू अंकुरित होऊन स्त्रिया व तरुणी हिरिरीने सहभाग घेतात संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी, सामकी माता, देव-देवतांची नावाने फेर धरत नृत्य केले जाते. 1 ते 9 सप्टेंबरदरम्यान तीजोत्सव साजरा करण्यात आला. अशा उपक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज बांधव एकत्र येतात यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळ तरुण मंडळाने या तिज उत्सवामध्ये सहभाग नोंदवला होता
0 Comments