-->

Ads

धुळीकणांनी कल्याण-डोंबिवलीतील नागरिक हैराण

काँक्रीट रस्त्यांवरील कोरडे सिमेंट कण, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये टाकलेली माती वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे हवेत उडत असल्याने कल्याण डोंबिवलीतील नागरिक काही दिवसांपासून धुळीकणाने हैराण आहेत.


कल्याण- काँक्रीट रस्त्यांवरील कोरडे सिमेंट कण, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये टाकलेली माती वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे हवेत उडत असल्याने कल्याण डोंबिवलीतील नागरिक काही दिवसांपासून धुळीकणाने हैराण आहेत. दमा, सर्दी, खोकल्याचा त्रास असणाऱ्यांना या धुळीकणांमुळे सर्वाधिक त्रास होत आहे.

वृध्द, ज्येष्ठ नागरिक, कृश प्रकृती असलेले धुळीकणांने सर्वाधिक बाधित होत आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील धुळीकणांची शनिवारची पातळी २.५ टक्के म्हणजे खुपच धोकादायक पातळीवर आहे. यामध्ये धुळीकण दिसत नाहीत, पण हवेत त्यांचा संचार असतो. काही ठिकाणी ही पातळी २.१० टक्के असल्याचे पर्यावरणविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिली आहे. हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण ३२ टक्के असले तरी हे प्रमाण वाढले तर दमा, खोकला, सर्दीचा त्रास असणाऱ्यांना सर्वाधिक त्रास होऊ शकतो. शहरातील सल्फर डाॅयऑक्साईडची पातळी १० म्हणजे उत्तम आहे, असे पर्यावरण प्रदुषणाची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिली आहे.

पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत. मागील २० दिवसांपासून पाऊस नसल्याने काँक्रीट रस्त्यांवरील सिमेंटचा धुरळा वाहनांमुळे हवेत उडत आहे. पावसाळ्यात खड्डे भरणीची कामे करताना ठेकेदारांनी खड्ड्यांमध्ये माती, खडी टाकली आहे. ही माती वाहनांमुळे हवेत उडून प्रदुषणाची पातळी वाढत आहे. डोंबिवली एमआयडीसी, घरडा सर्कल, पेंढरकर महाविद्याल तिठा, टिळक चौक, मानपाडा रस्ता, पत्रीपूल, शिवाजी चौक, कल्याण रेल्वे स्थानक परिसर, कोळसेवाडी, मुरबाड रस्ता भागात धुळ उडण्याचे प्रमाण अधिक आहे.

खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने धावत असल्याने प्रत्येक वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे कार्बन मोनाक्साईड हवेत सोडला जातो. हा वायु फुप्फसातून रक्तात सहज शोषला जातो. हिमोग्लोबिनमध्ये हा वायू मिसळल्यानंतर ऑक्सिजनची वहन क्षमता कमी होते. व्यक्ति अस्वस्थ होऊ शकते. या मिश्रणामुळे कार्बोक्सिल तयार होऊन डोकेदुखी, श्वसनाचा त्रास सुरू होऊ शकतो. कार्बोक्सिल हिमोग्लोबिनचे प्रमाण ५० टक्क्याच्या दरम्यान आले तर व्यक्तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. धुळीतून प्रवास करताना अशी काही लक्षणे आढळली तर तात्काळ प्रवाशाने डाॅक्टरांशी संपर्क करावा, असे या क्षेत्रातील जाणकाराने सांगितले.



Post a Comment

0 Comments