मागील महिन्यांत पोलिसांना सना खान यांच्याशी मिळताजुळता एक मृतदेह मध्यप्रदेशमध्ये आढळला होता.
नागपूर : भाजपच्या महिला नेत्या सना खान यांच्या हत्याकांडाचा तपास संथगतीने सुरु आहे. मागील महिन्यांत पोलिसांना सना खान यांच्याशी मिळताजुळता एक मृतदेह मध्यप्रदेशमध्ये आढळला होता.
मात्र, डीएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आला. त्यामुळे तो मृतदेह सना खान यांचा नव्हताच, असे स्पष्ट झाले.यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान कायम आहे.
भाजप नेत्या सना खान यांचा २ ऑगस्टला कुख्यात दारू माफिया अमित साहू याने खून केला होता. त्याने घरीच त्यांना मारले व त्यानंतर हिरन नदीत मृतदेह फेकला.सना यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी मोठे प्रयत्न केले. मात्र, मृतदेह आढळून आला नव्हता.आठ दिवसांनंतर अचानक जबलपूर पोलिसांना हरदा नदीजवळील शिराली तहसीलच्या एका विहिरीत सना यांच्यासारख्या वर्णनाचा मृतदेह आढळला होता.
मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने चेहरा ओळखणे शक्य झाले नव्हते.त्यामुळे मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून तो मृतदेह कुटुंबीयांच्या डीएनएशी जुळलेला नाही.
दरम्यान, पोलिसांनी अमित साहूच्या घरातील सोफ्यावरील रक्ताची फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सहाय्याने चाचणी केली.तसेच डीएनए चाचणीदेखील करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असून सना खान यांच्या रक्ताशी ते रक्त जुळलेले आहे. अमित साहूच्या घरात सना खान यांचे रक्त असल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच पोलिसांनी अमित साहूच्या मोलकरनीचा जबाब नोंदविला असून तिने सना खान यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बघितले होते. सध्या पोलिसांनी सना खान यांच्या हत्याकांडात पुराव्याची जुळवाजुळव सुरु केली आहे.
0 Comments